आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी कोणत्याही वयाची किंवा वेळेची वाट पाहत राहण्याची गरज नसते. याचा पुरेपूर प्रत्यय गायिका सुनिधी चौहानच्या कारकिर्दीवर नजर टाकताच येतो. संगीत जगतामध्ये आपल्या अनोख्या गायनशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सुनिधीने हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, पंजाबी, बंगाली, आसामी, नेपाळी, उर्दू या भाषांमध्ये आजवर बरीच गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे गायन क्षेत्रामध्ये तिचं करिअर घडावं यासाठी तिच्या वडिलांनी चक्क नोकरीचा त्याग केला होता. ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये अर्चना पुरणसिंगने याविषयी माहिती दिली.

‘द कपिल शर्मा’ शोमध्ये नुकतीच सुनिधी चौहान, अभिनेता संजय सुरी आणि दिव्या दत्त यांनी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी संजय आणि दिव्याने त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी बरीच चर्चा केली. यावेळी अर्चना पुरणसिंग यांनी सुनिधीच्या करिअरमधील अनेक गोष्टींचा खुलासा केला. इतकंच नाही तर आपल्या मुलीसाठी तिच्या वडिलांनी नोकरीचा त्याग केल्याचंही यावेळी अर्चना यांनी सांगितलं.

‘आपली लेक मोठी गायिका व्हावी अशी इच्छा दुष्यंत चौहान यांची होती. त्यामुळे त्यांनी त्यांची नोकरी सोडून मुंबई गाठली. मुंबईमध्ये येऊन सुनिधी गायिका व्हावी आणि तिचं स्वप्न पूर्ण व्हावं ही त्यांची मनापासून इच्छा होती. सुनिधीला कायम तिच्या वडिलांचा खंबीर पाठिंबा होता. त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे, पाठिंब्यामुळेच आज ती इतकी मोठी गायिका झाली. ज्यावेळी मी एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. त्यावेळी सुनिधी लहान होती आणि तिच वडील कायम तिचा हात धरुन तिला स्टेजवर आणायचे’, असं अर्चना यांनी सांगितलं.

दरम्यान, दिव्या दत्ता आणि संजय सुरी यांचा आगामी ‘झलकी’ हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ब्रह्मानंद एस. सिंग यांनी केली असून दिग्दर्शनदेखील त्यांनीच केलं आहे. या चित्रपटाची कथा एका ९ वर्षांच्या झलकी नावाच्या मुलीभोवती फिरताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये दिव्या आणि संजय व्यतिरिक्त तनिष्ठा चटर्जी, गोविंद नामदेव, अखिलेंद्र मिश्रा आणि बोमण इराणी हे कलाकारही झळकणार आहेत.