‘द जंगल बुक’ची लाइव्ह अ‍ॅनिमेशन आवृत्ती जगभर लोकप्रिय झाल्यानंतर डिस्ने आणि दिग्दर्शक जॉन फेवरु यांनी ‘द लायन किंग’ या अभिजात चित्रपटाचाही लाइव्ह अ‍ॅनिमेशन अवतार प्रेक्षकांसमोर आणला आहे. १९९४ साली ‘द लायन किंग’ हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित झाला होता. आता ज्या पिढीने तो अ‍ॅनिमेशनपट पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी लाइव्ह अ‍ॅनिमेशन अवतारात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात चांगली कमाई केली आहे. ‘द लायन किंग’ने शुक्रवारी १३.१७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘द जंगल बुक’लाही मागे टाकलं आहे.

भारतातील २१४० स्क्रिन्सवर हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी चित्रपटासाठी शाहरुख खान व त्याचा मुलगा आर्यन खानने आवाज दिला आहे. हॉलिवूडचा हा आठवा चित्रपट आहे, ज्याने भारतात पहिल्याच दिवशी दोन आकडी कमाई केली आहे.

Photos : तैमुर-इनाया खेळात मग्न; क्यूट फोटो व्हायरल

जॉन फेवरू यांनी ‘द लायन किंग’ला नव्या स्वरूपात सादर करताना मूळ चित्रपटाची फ्रेम न् फ्रेम कायम ठेवली आहे. नव्या ‘द लायन किंग’मध्ये खरेखुरे जंगल, खरेखुरे प्राणी अनुभवताना डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाही.