अभिनेत्री कंगना रणौत आणि आर माधवन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तनू वेड्स मनू’चा तिसरा भागही लवकरच येणार आहे. कंगनानं स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २०११ साली आलेला ‘तनू वेड्स मनू’ बॉक्स ऑफिसवर खूपच हिट ठरला. त्यानंतर २०१५ साली या चित्रपटाचा सिक्वलही आला. तोही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता चार वर्षांनंतर याचा तिसरा भागही येणार असल्याची खुशखबर कंगनानं दिली आहे. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘तनू वेड्स मनू ३’ ची औपचारिक घोषणा करण्यात येईल असं कंगनानं सांगितलं आहे.

कंगना सध्या . ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी ‘ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. अभिनयाबरोबरच कंगनानं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. ‘मणिकर्णिका’च्या प्रमोशनदरम्यान कंगनानं ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत ‘तनू वेड्स मनू ३’ येणार असल्याची माहिती दिली आहे. दिग्दर्शक आनंद राय यासंदर्भात लवकरच औपचारिक घोषणा करतील असंही कंगना म्हणाली. गेल्या वर्षभरात कंगना ‘मणिकर्णिका’च्या तर आनंद राय ‘झिरो’च्या चित्रीकरणात व्यग्र होते. त्यामुळे चित्रपटासंबधीत कोणत्याही चर्चा झाल्या नाहीत मात्र लवकरच तिसऱ्या भागाच्या स्क्रिप्टवर काम सुरू होईल अशीही माहिती कंगनानं दिली.

कंगनाचा २०१७ साली आलेला ‘रंगून’ आणि ‘सिमरन’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला त्यामुळे ‘मणिकर्णिका’कडून चाहत्यांच्या खूपच अपेक्षा आहे. या वर्षात कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ हे चित्रपट देखील प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे २०१९ हे वर्ष कंगनासाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे.