|| सुहास जोशी

एखाद्या आर्थिक घोटाळ्याचा शोध लागल्यानंतर त्याच्या आकडेवारीची मोठ्ठाली शीर्षकं सर्वत्र झळकतात. त्याची जोरदार चर्चादेखील होते. पण जेव्हा त्या घोटाळ्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न होऊ लागतो तसतसे त्यात आणखीनच अडकायला होते. मग अनेक नावं येत राहतात. अटकसत्र, जामीन, आरोप-प्रत्यारोप असा सारा सिलसिला मोठय़ा धमाक्यात सुरू असतो, पण पुढे जाताना हे प्रकरण एका विचित्र अशा टप्प्यावर येऊन ठेपते. अगदीच विचित्र. मग त्यातून आणखीन गुंता वाढत जातो. ही गुंतागुंत ‘द मेकॅनिझम’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये मांडायचा प्रयत्न झाला आहे. पण पहिल्या सीझनच्या मानाने हे नाटय़ तेवढे वेधक झालेले नाही. किंबहुना सीरिजकर्तेच काहीसे या गुंत्यात अडकले आहेत की काय असे वाटते.

ब्राझीलमध्ये गेल्या दीड दशकात घडलेल्या आर्थिक घोटाळ्यावर ‘द मेकॅनिझम’ ही वेबसीरिज बेतलेली आहे. या सीरिजचा पहिला सीझन २०१८ मध्ये आला होता, दुसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागाचा सारा भर हा नेमका घोटाळा काय झाला आहे हे शोधण्यावर होता. कागदपत्रांच्या कचऱ्यातून म्हणजेच यंत्राच्या सहाय्याने केलेले कागदाचे एक सलग तुकडे जोडून या घोटाळ्याचा शोध घेतलेला असतो. पण ज्याने याचा शोध घेतलेला असतो त्या रुफोलाच पोलीस दलातून बाहेर पडावे लागलेले असते. नव्याने आलेल्या टीमने देशभरातील ‘क्लब १३’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंत्राटदार आणि काही बडय़ा असामींना बेडय़ा ठोकलेल्या असतात. पण या सर्वामधील सर्वात बुद्धिमान असा खेळाडू जो तेल उद्योजक असतो तो मोकळाच असतो. दुसऱ्या सीझनची सुरुवात या तेल उद्योजकाला पकडण्यापासून होते. मात्र त्याच वेळी समांतरपणे ब्राझीलच्या राजकारणात वेगळंच काहीतरी शिजत असते. राष्ट्राध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू होतात. अनेक गट कार्यरत होतात. आणि पाहता पाहता विषयाला वेगळेच वळण लागते. आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती जशी सुरुवातीस वाटत होती तशी नाही याची जाणीव रुफोला सर्वात आधी होते. तो या सगळ्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न करतो. तेव्हा पार तीस वर्षे मागे घडलेल्या घटनांपर्यंत याचे धागेदोरे जाऊन ठेपतात.

तुलनेने या सीझनचा भर नाटय़मय घडामोडींवर कमी आहे. त्यामुळे एकूणच मालिका काहीशा संथपणे मार्गक्रमण करते. त्यातही पुन्हा कायद्याचा कीस पाडण्याच्या घटना बऱ्याच आहेत. तसा कीस तर आधीच्या भागातदेखील होता. पण त्याला जोडून पुढे अटकसत्र, काहीतरी नवीन उलगडणे अशा गोष्टी होत्या. या सीझनमध्ये त्या खूपच कमी आहेत. अशा वेळी कथानकाची जशी पकड असायला हवी तशी पकड खूप कमी प्रमाणात टिकून राहते.

अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका वठवल्या आहेत. काहीशा नीरस अशा या विषयामुळे संवादात खूप काही सनसनाटीपणा नसताना देहबोलीतून अनेक गोष्टी उलगडणे गरजेचे असते. ते येथे परिणामकारकरित्या दिसून येते. मूळ घटना ही आर्थिक घोटाळ्याची असली तरी त्यासोबत काही महत्त्वाच्या पात्रांच्या कुटुंबातील घटनादेखील महत्त्वाच्या आहेत. त्या पुरेशा प्रभावीपणे मांडणे शक्य झाले आहे. मुख्य पात्र रुफो हाच या कथेचा निवेदक आहे. जसजशी मालिका शेवटाकडे जाते तसतशी रुफोची मानसिकता बदलत जाते. घोटाळ्याच्या मुळाशी पोहोचताना आणि त्याचा उलगडा झाल्यानंतर एका वेगळ्याच पातळीवर पोहोचलेला रुफो अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. त्याच वेळी त्याच्या कौटुंबिक घटनादेखील कथानकास जोड देणाऱ्या ठरतात.

हे सर्व कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे यात अतिशयोक्तीचा भाग फारसा नाहीच. मालिका म्हणून सादर करण्यासाठी आणलेली रंजकता सोडल्यास इतर बऱ्याच घटना या वास्तवाशी जोडायचा प्रयत्न करण्यात आला आहे. काल्पनिक कथानकावर आधारित आर्थिक घोटाळ्यांच्या कथा अनेक पहायला मिळतात. त्यापेक्षा हा घोटाळा उलगडणारी सत्यकथा पाहणे हे तुलनेने अधिक रंजक आहे. मधल्या टप्प्यावर थोडासा कंटाळा येऊ शकतो, पण दोन्ही सीझन एकत्र पाहिल्यास विषयाची संगती लागून पाहणे सुकर ठरू शकते.

द मेकॅनिझम

ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स

सीझन – दुसरा