कल्पकता आणि व्यवसायिकता यांचा योग्य समन्वय साधणारा आजच्या जगातला चित्रपट प्रतिनीधी म्हणजे ‘स्टीव्हन स्पीलबर्ग’ होय. थॉमस एडिसन, अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टिव जॉब्स हे जसे आपापल्या क्षेत्रातील किमयागार आहेत. तसेच ‘स्टीव्हन स्पीलबर्ग’ हा चित्रपट क्षेत्रातील किमयागार आहे. आज स्पीलबर्गचा ७०वा वाढदिवस या पार्श्वभूमीवर त्याच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा….

‘स्टिव जॉब्स’ने माणसाच्या गरजा लक्षात घेतल्या आणि मानवी मनावर मोहिनी घालणारे तंत्रज्ञान विकसित केले. त्याचप्रमाणे स्पीलबर्गने मानवी मनातील खोलवर रुजलेल्या सुप्त आणि सामर्थ्यवान भावना हेरल्या. ‘स्टीव्हन स्पीलबर्ग’ हे अत्यंत प्रभावी आणि महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व आहे. त्याच्या चित्रपट दिग्दर्शनात भावनांचा स्थिर आणि दमदार प्रवाह दिसतो. तसेच प्रत्येक चित्रपटातून प्रेम, मत्सर, सूड, असूया या विचारांच्या पलीकडे जाऊन दडलेली भीती, सत्ता, एकटेपणा यांवर तो भाष्य करतो. स्टीव्हन स्पीलबर्ग हा जगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक आहे की नाही यावर वादविवाद होऊ शकतो. पण तो एका अभिजात लेखकाप्रमाणे चित्रपट माध्यमातून माणसाच्या मेंदूवर आणि मनावर ताबा मिळवतो यात शंका नाही.

तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना ‘एम्बलिन’ आणि ‘ड्युअल’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले. पुढे ‘जॉर्ज’, ‘ज्युरॅसिक पार्क’ या चित्रपटांतून भयाचे विविध आविष्कार स्पीलबर्गने दाखवले, ‘शिंडलर्स लिस्ट’ आणि ‘सेविंग प्रायवेट रायन’ यांमध्ये तर हे आविष्कार अधिक खोल आणि सशक्त होते. परस्पर उसवणारे नातेसंबंध, आई-वडिलांचे प्रेम न मिळाल्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता, भावनिक आधार शोधण्याची धडपड आणि त्यातून येणारे एकटेपण ही पार्श्वभूमी स्पीलबर्गच्या जवळ जवळ प्रत्येक चित्रपटातून जाणवते. ‘रेड्स ऑफ लास्ट लिंकन’ यांसारख्या फॅण्टसीपटातूनही ही पार्श्वभूमी सुटत नाही. विभक्त कुटूंब पद्धतीमुळे लहान मुलांतील एकटेपणा विस्तारत जातो. पुढे ही मुले पृथ्वीतलावरील आपले अस्तित्व शोधत राहतात. समजून घेणारे, निरपेक्ष प्रेम करणारे, मानसिक आधार देणारे त्यांना कोणीतरी हवे असते. अशा मुलांचे मनोगत आपल्या चित्रपटांतून हाताळण्याचा प्रयत्न स्पीलबर्ग करतो. अशाच एका ‘प्रायवेट रायन’ चित्रपटातील नायक साहसी परंतु खोलवर एकटा आहे.

या व्यतिरिक्त ‘एलियन्स’ या संकल्पनेत स्पीलबर्गला विशेष रस आहे. आकाशगंगेत पृथ्वीसारखेच अनेक ग्रह आहेत. जिथे पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टी आहे. जिथे राहणाऱ्यांना आपण एलियन म्हणतो. ही कल्पना स्पीलबर्गने चित्रपटांतून परिणामकारक पद्धतीने मांडली. एलियन्सला तो ‘ईटी’( ET ) म्हणतो, ‘Extra-Terrestrial’. विचित्र दिसणारे पण आकाशाकडे बोट दाखवून होम होम असे पुटपुटणारे ‘ईटी’ यांचा समन्वय माणसाशी साधण्याचा प्रयत्न स्पीलबर्ग करतो. ईटी हे प्रेम, मत्सर, हिंसा, प्रणय, द्वेष, महत्त्वाकांक्षा या भावनांच्या पलीकडे असले तरी ते देखील माणसाप्रमाणेच अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. माणूस आणि एलियन एकमेकांपासून भिन्न असूनही कसे समान आहेत अशा कल्पनांचा सुरेख संगम स्पीलबर्गच्या चित्रपटांतून पहायला मिळतो.

बॉलीवूडचे स्पीलबर्गला विषेश आकर्षण आहे. त्याला बॉलीवूडमध्ये हॉलीवूडचा रिमेक करायचा आहे, तोही बॉलीवूडच्याच धर्तीवर असे सुतोवाच त्याने नुकत्याच केलेल्या भारत भेटीत केले. त्यामागे कदाचीत त्याचे व्यावसायिक चातुर्य असेलही. पण मानवी संबंध हाताळण्याच्या बॉलीवूडच्या विशेष शैलीचे स्पीलबर्गला कुतूहल आहे.

स्पीलबर्गला ‘सत्यजीत रे’ यांचे मोठेपण पटले व ‘राज कपूर’ यांचा ‘आवारा’ हा चित्रपट आवडला. तसेच ‘थ्री इडियट्स’ चे विशेष कौतुक त्याने केले. पण तो इतक्यावरच थांबला नाही. तर मुद्दाम वेळ काढून ‘थ्री इडियट्स’ची पटकथा राजू हिरानीकडून त्याने समजून घेतली.
हॉलीवूड व बॉलीवूड यांची बलस्थाने वेगळी आहेत. तसेच त्यांच्या मर्यादाही अगदी ठळक आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या कलाकारांत बराच फरक जाणवतो. पण स्पीलबर्ग त्याला अपवाद आहे. कारण हॉलीवूडची बुद्धी, स्पर्धा, तंत्रकौशल्य आणि बॉलीवूडची आत्मियता, नातेसंबंध, परस्पर पूरक ठरणाऱ्या मानवी जाणिवा या सगळ्याच बाबी आपल्या चित्रपटांतून हाताळणारा ‘स्टीव्हन स्पीलबर्ग’ मानवी मनावर मोहिनी घालणारा किमयागार आहे.

मंदार गुरव

mandar.gurav@loksatta.com