हॉलिवूड चित्रपटांना भारतीय प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद लाभताना दिसत आहे, याचं ताजं उदाहरण म्हणजेच ‘द नन’ हा चित्रपट. सध्या भारतीय प्रेक्षकांची पावलं ‘द नन’ पाहण्यासाठी वळताना दिसत आहेत. म्हणावं तशा उत्तम भयपटाची निर्मिती बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत झालेली नाही म्हणूनच हॉलिवूडमधल्या या हॉरर चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

‘द नन’ या चित्रपटाला जगभरातील समीक्षकांकडून जरी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी भारतात हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटानं ३० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यापूर्वी ‘स्त्री’हा हॉरर कॉमेडी चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटानं ८२ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला हॉलिवूडची ‘द नन’ चांगलीच टक्कर देत आहे.

‘द नन’चं कथानक हे १९५२ मधल्या सेंट कार्टा स्थित ऐबीमधील एका घटनेभोवती फिरतं. या ऐबीमध्ये म्हणजेच जिथे नन राहत असतात तिथे काही अप्रिय घटना घडते. या ऐबीचं नक्की रहस्य काय आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ‘द नन’मध्ये दडली आहेत. एकीकडे स्त्री तर दुसरीकडे ‘द नन’ अशी चढाओढ बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे.

‘काँज्युरिंग’ सिरिजमधल्या आधीच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘द नन’ कडेही मोठा प्रेक्षकवर्ग आकर्षित होत आहे. हा चित्रपट भारतात ५० कोटींहूनही अधिक कामाई करेल असं म्हटलं जात आहे.