अभिनेता शाहरुख खानने ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन केल्याने ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटात सूत्रसंचालकाची भूमिका साकारण्याची ऑफर त्याला मिळाली होती. शाहरुखने चित्रपटात काम करायला सुरुवातही केली होती, मात्र नंतर त्याने चित्रपटातून काढता पाय घेतला. मग शाहरुखची जागा अनिल कपूरने घेतली.

२०१० मध्ये ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने जोनाथन रॉसच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला ‘स्लमडॉग मिलेनियर’ची ऑफर नाकारण्याबाबत प्रश्न विचारला गेला होता. तेव्हा शाहरुख म्हणाला, “चित्रपटाचा दिग्दर्शक डॅनी माझा चांगला मित्र आहे. चित्रपटाचा विषयसुद्धा चांगला होता. पण ज्या सूत्रसंचालकाची भूमिका मला देण्यात आली होती, तो स्वार्थी आणि फसवणूक करणारा दाखवण्यात आला. मी आधीच कौन बनेगा करोडपती या शोचं सूत्रसंचालन केलं आहे. त्यामुळे लोकांना मीसुद्धा तसाच आहे असं वाटू नये म्हणून मी माघार घेतली.”

‘स्लमडॉग मिलेनियर’चं दिग्दर्शन डॅनी बॉयलेनं केलं होतं. शाहरुखने माघार घेतल्याने तो नाराज झाला होता. याविषयी शाहरुखने नंतर बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होती, “मला माहितीये की डॅनी माझ्यावर नाराज आहे. पण तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. भारताविषयी त्याचं खास प्रेम आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मला जाणवलं की अनिल कपूर यांनी दमदार भूमिका साकारली होती आणि चित्रपटाला यश मिळणं साहजिक होतं.”

‘स्लमडॉग मिलेनियर’ने प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार पटकावला. जगभरात या चित्रपटाने दणक्यात कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर अनिल कपूर यांना ‘मिशन इम्पॉसिबल- घोस्ट प्रोटोकॉल’ या चित्रपटात आणि ‘२४’ या टीव्ही शोमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.