एकीकडे राज्यामध्ये सत्तास्थापनेवरुन संघर्ष दिवसोंदिवस अधिक गुंतागुंतीचा होताना दिसत आहे. त्यातच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरु आहे. कोणाचे सरकार येणार यावरील पडता अद्याप उठलेला नाही. अशाच शुक्रवारी सकाळी अचानक मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक बड्या कलाकारांनी ट्विटवर #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरुन ट्विट केले आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मराठी कलाकारांनी हे ट्विटस केले आहे. अनेकांना हा हॅशटॅग पटलेला नसून त्यावरुन या कलाकारांवर टीका केली आहे. अभिनेत्यांनी राजकारणात पडू नये असा सल्ला अनेकांनी कलाकारांना दिला आहे. मात्र आता या हॅशटॅगमागील खरी कहाणी समोर आली आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार की मध्यवर्ती निवडणूक होणार यासंदर्भात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्याच आज अनेक मराठी कलाकारांनी केवळ #पुन्हानिवडणूक? इतकंच ट्विट केलं आहे. यामध्ये सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, वैभव गयानकर या कलाकारांचा समावेश आहे. काँग्रेसने भाजपा आयटी सेलच्या माध्यमातून मुद्दा कलाकारांच्या मदतीने पुन्हा निवडणूक घेण्यासंदर्भातील हा हॅशटॅग चालवला जात असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटवरुन याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मात्र आता हा हॅशटॅग म्हणजे एका आगामी चित्रपटाचे प्रमोशन असल्याची माहिती समोर आली आहे.

#पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग प्रमोशनचा भाग आहे. धुरळा या चित्रपटाचे हे प्रमोशन असून समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच चित्रपटाशी संबंधित कलाकारांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात इतर माहिती देण्यास चित्रपटाशी संबंधित कलाकारांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.