‘द रेव्हनंट’ या नाटय़मय घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटाला बॅफ्टा २०१६ मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून त्यातील अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियो याने सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे या महिनअखेरीस तो ऑस्कर पुरस्कार पटकावणार अशी चिन्हे दिसत आहेत. ब्रिटिश चित्रपट क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे असलेले पुरस्कार व्हॅलेंटाईन दिनाला प्रदान करण्यात आले. अॅलेजांद्रो गोंझालेझ इनारिटू यांच्या ‘द रेव्हनंट’ चित्रपटाने पाच पुरस्कार पटकावले आहेत तर नऊ नामांकने असूनही ‘कॅरॉल’ चित्रपटाला पुरस्कार मिळू शकला नाही.
लिओनाडरे डिकॅप्रियो याने हॉलिवूड पुरस्कार कार्यक्रमातही बाजी मारली होती. रेव्हनंट चित्रपटात त्याने ह्य़ूज ग्लास या फर ट्रॅपरची भूमिका केली असून ती अतिशय अवघड होती. त्याला द अॅव्हिएटर, द डिपार्टेड व द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट या तीन चित्रपटात बॅफ्टाचे नामांकन मिळाले होते. ‘‘पूर्व लॉसएंजलिस येथे मी अतिशय वेगळ्या परिस्थितीत वाढलो, तेव्हा हिने मला रोज तीन तास वेगवेगळ्या शाळात नेऊन शिक्षणाच्या संधी दाखवल्या,’’ असे त्याने आईचा गौरव करताना म्हटले आहे. गेल्या वर्षी ‘द बर्डमॅन’ चित्रपटासाठी ऑस्कर पटकावणारे इनारिटू यांनी सांगितले की, बॅफ्टा चित्रपटात मिळालेले यश भारावून टाकणारे आहे. ब्राय लार्सन हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘रूम’ या चित्रपटातील (एका अपहृत महिलेला मुलासह लहान खोलीत ठेवलेले असते) भूमिकेसाठी मिळाला आहे. तिचा पुरस्कार दिग्दर्शक लेनी अब्राहमसन यांनी स्वीकारला.
द रेव्हनंट शिवाय जॉर्ज मिलर यांच्या ‘मॅड मॅक्स फ्युरी रोड’ या चित्रपटास गौरवण्यात आले आहे. संपादन, वेशभूषा, निर्मिती, केशभूषा, मेकअप यासाठी या चित्रपटाला एकूण चार पुरस्कार मिळाले.
डिकॅप्रियोची टायटॅनिकमधील सहअभिनेत्री केट विन्सलेट हिला तिसऱ्यांदा बॅफ्टा पुरस्कार मिळाला आहे. अॅपलची विपणन अधिकारी जोएना हॉफमन हिची भूमिका स्टीव्ह जॉब्ज चित्रपटात तिने साकारली आहे. ‘मी चौदा वर्षांची होते तेव्हा नाटय़ शिक्षकांनी मला तू जोपर्यंत जाडजूड पात्रे रंगवू शकतेस तोपर्यंतच काम कर असे सांगितले होते. तुम्ही आता माझ्याकडे बघा. तरूण मुलींनी भीती व असुरक्षितता मनात बाळगू नये,’ असे विन्सलेट म्हणाली. ‘ब्रिज ऑफ स्पाईज’ या स्टीव्हन स्पीलबर्गच्या चित्रपटातील भूमिकेसाठी मार्क रायलन्स यांना उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ब्रिटिश-भारतीय अभिनेता असीफ कपाडीया याने ‘अॅमी’ या माहितीपटासाठी पुरस्कार पटकावला. हा माहितीपट गायक अॅमी वाइनहाऊस यांच्यावर आहे. पत्रकारितेवरील ‘स्पॉटलाईट’ या चित्रपटाला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक टॉम मॅकार्थी यांनी हे यश बोस्टन ग्लोबच्या पत्रकारांना समर्पित केले. ‘बिग शॉर्ट’ या चित्रपटाला उत्कृष्ट रूपांतरित पटकथेचा पुरस्कार मिळाला.
निक हार्नबी यांचा ‘ब्रकुलिन’ हा उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट ठरला. ‘द रेव्हनंट’ साठी इमॅन्युएल ल्युबेझकी यांनी छायाचित्रलेखनाचा पुरस्कार पटकावला, डिस्ने-पिक्सरच्या इनसाईड आउटने उत्कृष्ट अॅनिमेशनपटाचा पुरस्कार मिळवला, तर उत्कृष्ट परदेशी चित्रपटात ‘थीब’ या चित्रपटाने बाजी मारली.
विशेष दृश्य परिणामांसाठी ‘स्टार वॉर्स- द फोर्स अवेकन्स’ या चित्रपटाने पुरस्कार पटकावला.