चित्रपटात काम केलं की अभिनेते अभिनेत्रींचं काम संपलं असं होतं नाही. आजकल प्रत्येक कलाकाराला त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही जातीनं लक्ष घालावं लागतं. प्रमोशनचे वेगवेगळे फंडे आजमावून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण करावं लागतं. शेवटी चित्रपटाच्या प्रमोशनवरच जास्तीत जास्त खेळ अवलंबून असतो. पण, चित्रपटाच्या प्रमोशनचं मानधन कलाकारांना मिळतचं असं नाही. पण अनेकांना हे ऐकून धक्का बसेल की हॉलिवूड अभिनेता द रॉक स्वत:च्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही जबरदस्त मानधन आकारतो.

रॉकचा ‘रेड नोटीस’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा अभिनेता म्हणून  प्रमोशनची जबाबदारी अर्थात त्याच्यावर आहे. त्यामुळे या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी त्यानं ७ कोटींचं मानधन मागितलं आहे. रॉकचे इन्स्टाग्रामवर १० कोटींहूनही अधिक फॉलोअर्स आहेत. रेड नोटीसचं प्रमोशन फेसबुक, ट्विटवर करण्यासाठी त्यांनी एवढी मोठी रक्कम मागितली आहे.

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो या चित्रपटासंदर्भात काही मोजके ट्विट करणार आहे. त्यासाठी त्यांनी एवढी रक्कम आकारली आहे. अर्थात ही रक्कम बॉलिवूडमधल्या टॉपच्या सेलिब्रिटींच्या एका चित्रपटाच्या मानधनापेक्षाची कितीतरी पटींनी अधिक आहे. नुकतीच हॉलिवूडमधल्या अनेक बड्या कलाकारांच्या मानधनाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत रॉकच्याही नावाचा सहभाग आहे.