बऱ्याचवेळा बॉलिवूड कालाकार नैराश्याचा सामना करत असल्याच्या चर्चा सुरु असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदूकोणने नैराश्याचा समाना केला होता. पण तिने त्यावर विजय मिळवला. तसेच अभिनेत्री आलिया भट्टची बहिण शाहीन भट्टने देखील नैराश्याचा सामना केला होता. शाहीन वयाच्या १३व्या वर्षी नैराश्यामध्ये होती. त्यावेळी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा एका कार्यक्रमाध्ये केला आहे.

शाहीन आणि आलियाने नुकताच ‘द तारा शर्मा शो’मध्ये आई सोनी राजधन सोबत हजेरी लावली. दरम्यान शाहीनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. ‘द तारा शर्मा शो’च्या आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी शाहीनच्या डोक्यात कोणते विचार सुरु होते असा प्रश्न शोची सूत्रसंचालक तारा विचारताना दिसते.

‘मी कोणत्याच गोष्टीचा विचार करत नव्हते. मला फक्त एवढे जाणवत होते की मी हे सहन करु शकत नाही’ असे शाहीन म्हणाली. आपण इतर आजारांप्रमाणेच नैराश्याकडे बघितले पाहिजे असे म्हणत आलियाने तिचे मत मांडले. त्याचबरोबर या आजाराबद्दल आपण सर्वप्रथम आपल्या आई- वडिलांशी बोलायला हवे असे सोनी राजधन यांनी म्हटले.

शाहीनने नैराश्यावर एक पुस्तक देखील लिहिले आहे. या पुस्तकाचे नाव ‘I have never been unhappier’ असे आहे. या पुस्तकामध्ये तिने नैराश्यानमधून बाहेर पडण्यासाठी जो संघर्ष केला तो मांडला आहे. शाहीनचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आलियाने एक भावुक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ती पोस्ट चाहत्यांना प्रचंड आवडली होती. आलियाची ती पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.