भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरील प्रश्नांवर ‘द ताश्कंद फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शाह, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी, श्वेता बसू, अंकुर राठी आणि प्रकाश बेलवडी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर विवेक अग्निहोत्रीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

ताश्कंद डिक्लरेशन’ ऊर्फ ‘ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट’ हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी केला गेला. सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी सह्य़ा केल्या. ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी, ११ जानेवारी १९६६ रोजी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे अकस्मात निधन झाले. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या घडामोडींची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

यामध्ये मंदिरा बेदी ही सामाजिक कार्यकर्त्या इंदिरा जोसेफ रॉय यांच्या भूमिकेत, आएशा अली शाह यांच्या भूमिकेत पल्लवी जोशी, गंगाराम झा यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी, रागिनी फुलेच्या भूमिकेत श्वेता बसू, श्याम सुंदर त्रिपाठींच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती आहेत. येत्या १२ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.