मराठी चित्रपट कलाकृतींचा जागतिक पातळीवर सन्मान करणारा ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल’ (IMFF) लवकरच मॉरिशसमध्ये रंगणार आहे. ‘शार्दुल क्रिएशन्स’ आणि ‘सीएमए फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या जूनमध्ये मॉरिशसमध्ये होणाऱ्या या सोहळ्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल’
२०१४ च्या सन्मानचिन्हाचे अनावरण मुंबईत एका शानदार समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी ‘शार्दुल क्रिएशन्स’चे शिरीष राणे, ‘हिंदु हाऊस मॉरिशस’चे अध्यक्ष विरेंद्र रामधन, ‘बेस्ट समिती’चे अध्यक्ष नाना आंबोले, आमदार पंकज भुजबळ, दिग्दर्शक-अभिनेते विजय पाटकर, म्हाडाचे अध्यक्ष प्रसाद लाड, महाराष्ट्र व्यापारी पेठेचे अध्यक्ष अनंत भालेकर, ‘तिरुपती बालाजी ग्रुप’चे महेंद्र सिंग, ‘सिएमए ग्रुप’चे परेश सेठ, ‘आर. आर. ग्रुप’चे राहुल पाटील, ‘अल्ता फाय विस्टा’चे एल. जी. पुजारी, अभिनेते आदेश बांदेकर आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.

यावेळी निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे, गायिका पद्मजा फेणाणी, वैशाली सामंत, गायक सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर, अभिनेता जितेंद्र जोशी, सुनिल बर्वे, विजय कदम, जयवंत वाडकर, ऋषिकेश जोशी, अभिजीत केळकर, सुशांत शेलार, पॅडी कांबळे, अभिनेत्री निशा परुळेकर, दिग्दर्शक समृध्दी पोरे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
येत्या जून महिन्यात मॉरिशसमध्ये रंगणाऱ्या ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल’ २०१४ च्या सोहळ्यात मराठी तारे-तारकांच्या मनोरंजनाचा धमाकेदार कार्यक्रम होणार आहे. नृत्य, संगीत आणि विनोद यांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना यानिमित्ताने मिळणार आहे. या सोहळ्यासोबत अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. एका खास सत्राचे आयोजीत करण्यात येणार असून, यात मराठी निर्मात्यांना मॉरिशसमध्ये चित्रीकरण करण्यासंदर्भातील सोयी-सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. ज्यात मॉरिशस सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती, परवानगी मिळण्यासंदर्भातील तपशील, अनुदान या सारख्या अनेक महत्वपूर्ण गोष्टींवर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. सोबत सध्याच्या मराठी चित्रपटांचा आढावा घेणारा मान्यवरांचा परिसंवाददेखील रंगणार आहे. याशिवाय अनेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल’ (IMFF) मध्ये करण्यात येणार आहे. ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल’मध्ये सहभागी होण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.