‘डिस्ने’ कंपनीने ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ कंपनी विकत घेतल्याने जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रात मोठा बदल घडणार आहे. आतापर्यंत अ‍ॅनिमेशनपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘डिस्ने’ कंपनीकडे सध्या वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, वेबसीरिज आणि तत्सम आशय यावर मालकी हक्क आला आहे. याचा परिणाम थोडय़ाबहुत प्रमाणात भारतीय मनोरंजन उद्योगातही उमटणार आहे..

‘डिस्ने’ हा शब्द कानावर पडल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या डोळ्यांसमोर काय येते? मिकी आणि मिनी माऊस, डोनाल्ड डक, ऑस्वल्ड, अ‍ॅलीस, गुफी यांसारख्या कार्टून व्यक्तिरेखा किंवा अगदी फार फार तर ‘द जंगल बुक’, ‘द लायन किंग’, ‘अल्लाउदीन’, ‘ब्यूटी अँड द बिस्ट’, ‘टारझन’ यांसारखे काही मोजके अ‍ॅनिमेशनपट. डिस्ने म्हणजे फक्त कार्टून किंवा लहान मुलांना रिझवणारे बालपट तयार करणारी कंपनी असे काहीसे भ्रमित चित्रण आपल्या डोक्यात अगदी पक्के बसले आहे. परंतु कार्टून बनवणारी ही कंपनी येत्या काळात संपूर्ण जगाच्या मनोरंजनाची दिशा ठरवणार, असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Developed an innovative method to diagnose Parkinson in the first stage Mumbai
मुंबई: कंपवाताचे पूर्वनिदान करता येणार
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली

१९२३ साली वॉल्ट डिस्ने नामक एका अवलियाने डिस्ने कंपनीची सुरुवात केली. कुठलीही नवीन कल्पना अस्तित्वात आणली जात असताना त्याला समाजातील तथाकथित बुद्धिवान मंडळींचा विरोध होतोच आणि त्याला वॉल्ट डिस्नेदेखील अपवाद नव्हते. त्यांच्याही भन्नाट कल्पनांचा समाजातून जाहीर उद्धार केला गेलाच. परंतु ते थांबले नाहीत. तुम्ही भव्य स्वप्नं पाहिलीत, तरच ती तुम्ही पूर्ण करू शकता, या मंत्राचा जप करत त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. आज त्याच कंपनीने ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ या कंपनीला विकत घेतले आहे. वरकरणी पाहता हा एक साधा व्यवहार आहे. जगभरात असे व्यवहार दररोज होत असतात. अनेक लहानमोठय़ा कंपन्या एकमेकांत गुंतवणूक करतच असतात. या पाश्र्वभूमीवर विचार करता डिस्नेने फॉक्स कंपनीला विकत घेतले तर त्यात नवीन काय आहे, असा प्रश्न पडतो. ‘सेक्रेड गेम्स’ या वेब मालिकेतील ‘कभी कभी लगता है अपुन ही भगवान है’ हे वाक्य फार लोकप्रिय झाले होते. ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ ही कंपनी विकत घेतल्यामुळे डिस्ने कंपनी हेच वाक्य उच्चारेल, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

३१ मे १९३५ साली सुरू झालेली ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ ही जगातील सर्वात मोठय़ा चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या कंपनीने आजवर ‘अवतार’, ‘टायटॅनिक’, ‘लाइफ ऑफ पाय’, ‘द रेव्हेनंट’ यांसारखे हजारो सुपरहिट चित्रपट तयार केले आहेत. गेल्या ८० वर्षांत जगभरातून जितके ब्लॉकबस्टर चित्रपट तयार केले गेले, त्यातील  जवळपास ६० टक्के चित्रपट हे ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ या बॅनरखालीच तयार झाले आहेत. शिवाय गेल्या २० वर्षांत त्यांनी ‘ब्लू स्काय’, ‘अमेरिकन डॅड’, ‘स्काय टीव्ही नेट जिओ’ यांसारख्या अनेक कंपन्यांना गिळंकृत केले. या कंपन्यांच्या मदतीने टीव्ही, रेडिओ, म्युझिक, स्पोर्ट्स, न्यूज, ब्रॉडकास्टिंग यांसारख्या माध्यम उद्योगातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीमुळे ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ कंपनीचा आवाका तब्बल ३ लाख ६६ हजार कोटींचा झाला होता. या कंपनीला डिस्नेने ४ लाख ९७ हजार कोटी रुपयांना विकत घेतले. या व्यवहारामुळे फॉक्सने आजवर तयार केलेले हजारो चित्रपट, मालिका, व्यक्तिरेखा, गाणी, पुस्तकं, लहानमोठय़ा सर्व वाहिन्या, ब्रॉडकास्टिंग कंपन्या, विविध प्रकारचे स्टुडिओ या सर्व प्रकारच्या साहित्यावर आता यापुढे डिस्नेचा अधिकार स्थापित झाला आहे. फॉक्सने दशकानुदशकांच्या अथक प्रयत्नांतून तयार केलेल्या या हजारो कोटींच्या साहित्याचे भविष्य आता डिस्ने कंपनीच्या हातात आहे.

डिस्ने फक्त फॉक्स नेटवर्क विकत घेऊन शांत बसलेले नाहीत. तर त्यानंतर ‘एबीसी टेलिव्हिजन ग्रुप’, ‘ईएसपीएन’, ‘लुकास फिल्म लिमिटेड’, ‘माव्‍‌र्हल एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पिक्सार’ या कंपन्यांनादेखील त्यांनी विकत घेतल्या आहेत. ७६ वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘एबीसी’ ही टेलिव्हिजन जगतातील सर्वात मोठय़ा कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. पॅक्सन, ट्रिब्यून, गॅनेट यांसारखे जगभरातील २५ पेक्षा अधिक आघाडीचे नेटवर्क ‘एबीसी’साठी काम करतात. यांच्या मदतीने त्यांनी टेलिव्हिजन व वृत्त माध्यमक्षेत्रात जवळपास एकाधिकारशाहीच निर्माण केली आहे. अशीच काहीशी मक्तेदारी ‘ईएसपीएन’ने क्रीडाविश्वात निर्माण केली आहे. ‘स्टार वॉर्स’ आणि ‘इंडियाना जोन्स’सारख्या यशस्वी चित्रपट मालिकांसाठी ओळखली जाणारी ‘लुकास फिल्म लिमिटेड’ ही फॉक्सप्रमाणेच एक मोठी चित्रपट कंपनी आहे. त्यांनीदेखील गेल्या ४७ वर्षांत शेकडो चित्रपट तयार केले आहेत. सुपरहिरोंचा कारखाना म्हणून ओळखली जाणारी ‘माव्‍‌र्हल एन्टरटेन्मेंट’ ही चित्रपट उद्योगातील सध्याची सर्वात आघाडीची कंपनी आहे. २.७९ दशलक्ष अमेरिकी डॉलरची कमाई करून जगातील सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान असलेला ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा माव्‍‌र्हलच्याच कारखान्यात तयार झालेला चित्रपट होता. तसेच त्यांच्या भविष्यकालीन तयारीचा विचार करता ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ ही तर फक्त सुरुवात होती असेच म्हणावे लागेल. याशिवाय ‘पिक्सार’ हीदेखील एक मोठीच कंपनी आहे. प्रत्येक वर्षी किमान एका ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरणारच या इराद्याने चित्रपट तयार करणाऱ्या ‘पिक्सार’मुळे गेल्या ३३ वर्षांत सिनेतंत्रज्ञानात अनेक क्रांतिकारी बदल झाले आहेत. त्यांच्यामुळेच अ‍ॅनिमेशन हा प्रकार अधिक समृद्ध झाला. या कंपन्यांच्या खरीदारीमुळे मनोरंजन क्षेत्रातील जवळपास ७० टक्के भाग आता डिस्नेच्या अधिपत्याखाली आला आहे. याचे एक लहानसे उदाहरण म्हणजे जगात सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या पहिल्या १० चित्रपटांची यादी पाहिली तर त्यातील ‘ज्यूरासिक वर्ल्ड’ व ‘फ्युरियस ७’ हे दोन चित्रपट वगळता उर्वरित आठ चित्रपट हे आता डिस्नेच्या मालकीचे झाले आहेत. यावरूनच आपल्याला डिस्नेची वाढलेली ताकद लक्षात येते. परंतु आता नवीन प्रश्न म्हणजे या सर्व घडामोडींचा भारतीय मनोरंजनसृष्टीवर काय परिणाम होणार? हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल.

भारतात दादागिरी चालेल?

पाश्चात्त्य मनोरंजन संस्कृतीवर साय-फाय, इतिहास, कार्टून, अ‍ॅनिमेशन, लाइव्ह अ‍ॅक्शन या प्रकारच्या साहित्याचा मोठा प्रभाव आढळतो. डिस्ने कंपनीही याच प्रकारच्या साहित्यावर आजवर गुंतवणूक करताना दिसली आहे. या पाश्र्वभूमीवर विचार करता फॉक्ससारख्या कंपन्या गिळंकृत करणे त्यांना नक्कीच फायदेशीर ठरले, परंतु भारतात त्यांची दादागिरी चालेल का? ‘फॉक्स’ कंपनीने ‘स्टार नेटवर्क’ या बॅनरखाली भारतात हजारो कोटींची गुंतवणूक केली होती. यात स्टार प्रवाह, स्टार प्लस, स्टार गोल्ड इथपासून अगदी स्टार स्पोर्ट्सपर्यंत तब्बल ३० वाहिन्या फॉक्ससाठीच काम करत होत्या. ‘नॅशनल जिओग्राफी’ व ‘डिस्कव्हरी’ हे नेटवर्कदेखील फॉक्ससाठीच काम करत होते. याव्यतिरिक्त ‘टाटा स्काय’, ‘एअरटेल डिजिटल’, ‘डिश टीव्ही (इंडिया)’, ‘व्हिडीओकॉन डी२एच’, ‘रिलायन्स डिजिटल टीव्ही’ या ब्रॉडकास्ट कंपन्यांचीही ५० टक्के मालकी फॉक्सकडेच होती. ‘फॉक्स स्टार स्टुडिओ इंडिया’ या बॅनरखाली त्यांनी ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘संजू’, ‘एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ यांसारखे शेकडो ब्लॉकबस्टर बॉलीवूडपट तयार केले आहेत.  याशिवाय ‘हॉटस्टार’सारखे वेबनेटवर्कही त्यांच्याकडे होते. फॉक्स एवढय़ावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी ‘हॅथवे’ आणि ‘एशियानेट डिजिटल टीव्ही’ या नेटवर्कमध्येही गुंतवणूक करून भारतातील बहुतांश केबल व इंटरनेट पुरवठय़ाचे हक्कदेखील स्वत:कडेच ठेवले होते. एका पाश्चात्त्य कंपनीने भारतीय माध्यमक्षेत्रात केलेली ही गुंतवणूक नक्कीच अवाक् क रणारी आहे. हजारो कोटींचा नफा मिळवून देणारे स्टार नेटवर्क हे भारतातील अत्यंत लोकप्रिय नेटवर्क असून फॉक्सने विकत घेतल्यामुळे त्यांचे संपूर्ण स्टार नेटवर्कही आता डिस्नेकडेच आले आहे. क्रिकेट हा खेळ भारतात कोणत्याही ब्लॉकबस्टर चित्रपटाला लाजवेल इतका नफा मिळवून देतो. आता हा संपूर्ण नफा स्टारमार्फत डिस्नेच्या खात्यात जमा होणार आहे. डिस्नेने केलेली ही गुंतवणूक पाहता पाश्चात्त्य माध्यम उद्योगाबरोबरच आता आपल्या देशातीलही बहुतांश भाग त्यांनी काबीज केला आहे. अर्थात, डिस्नेने भारतीय मनोरंजन क्षेत्रात अद्याप कोणतेही मोठे बदल केलेले नसले तरी ‘अ‍ॅव्हेंजर्स’, ‘द जंगल बुक’, ‘द लायन किंग’, ‘कॉन्ज्युरिंग’, ‘फँटास्टिक बीस्ट’ यांसारख्या हॉलीवूडपटांचा वाढलेला बाजारभाव व भारतीय चित्रपटांच्या नाकावर टिच्चून त्यांनी केलेली कोटय़वधींची कमाई ही होणाऱ्या बदलांची सुरुवात आहे, असे नक्कीच म्हणावे लागेल. मनोरंजन उद्योगात साधारणपणे चित्रपट, मालिका, खेळ आणि वृत्तमाध्यमे या क्षेत्रांनी बहुतांश भाग व्यापला आहे. गेल्या काही काळात झालेल्या उलाढालींमुळे या भागांची जवळपास ६० ते ७० टक्के मालकी आता डिस्नेकडे आली आहे. त्यामुळे हजारो चित्रपट, मालिका, कथानके व व्यक्तिरेखा यांचा हवा तसा वापर करण्याची शक्ती आता डिस्नेकडे आली आहे. या पाश्र्वभूमीवर विचार करता ‘कभी कभी लगता है साला अपुन ही भगवान है’, असा विचार त्यांच्या मनात जोर धरू लागला असेल तर नवल नाही, कारण हे वास्तवात घडलं आहे!