सुहास जोशी

चित्रपटाचे कोणत्या ना कोणत्या तरी ठरावीक पद्धतीत, साच्यात, प्रकारात वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. अनेकदा त्यावरूनच कथेचा बाज समजतो. पण कधी कधी कथानक सुरू होते आणि सुरूवातीलाच काहीशी थरारक अशी घटना घडते. पण त्यानंतर त्या घटनेच्या अनुषंगाने मुळाकडे जाताना वेगळ्याच वाटेवर प्रवास होतो. उत्कंठा कायम राहते, फार मोठे औत्सुक्य दडले नसले तरी चित्रपट पाहिला जातो, असेच ‘वेडिंग गेस्ट’ या अ‍ॅमेझॉन प्राइमवरील वेबफिल्ममध्ये होते.

नावाला अनुसरूनच कथेची सुरुवात होते ती लग्नाला आलेल्या पाहुण्यापासून. एका देशातून दुसऱ्या देशातला प्रवास, नंतर वेगवेगळ्या गाडय़ा बदलत लग्नगावी पोहोचणारा पाहुणाच आपल्याला दिसतो. वाटेत तो बंदुका विकत घेतो, दोनतीन वेळा नाव बदलतो, गाडय़ा सोडून देतो आणि अखेरीस पाकिस्तानातील सीमावर्ती भागात पोहोचतो. येथपर्यंत त्याचे पाहुणेपण टिकते मात्र.. लग्नाच्या आदल्याच दिवशी तो थेट नवऱ्या मुलीलाच पळवतो. ही मुलगी उच्च शिक्षणासाठी काही काळ लंडनला राहिलेली असते. तिच्याच लंडनमधील प्रियकराने पाहुण्यास पाठवलेले असते आणि तो त्या दोघांना भारतात भेटणार असतो. पण या सगळ्या गडबडीत सुरक्षा रक्षक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा पाहुण्याच्या हातून खून होतो. इकडे पाहुणा आणि नवरी मुलगी खोटे पासपोर्ट वापरून राजमार्गाने भारतात येतात, पण मुलीचा प्रियकर भेटण्यासाठी टाळाटाळ करू लागतो. कारण सुरक्षा रक्षकाच्या खुनाची बातमी जगभर पसरलेली असते आणि त्यात मुलीचा फोटो असतो. मग कुरघोडीचा एकच खेळ सुरू होतो. एका शहरातून दुसऱ्या शहरात असा प्रवास सुरू राहतो. प्रियकराने अंग काढून घेतल्यामुळे त्या दोघांनी मिळून रचलेला पूर्वनियोजित डाव बारगळतो. मुलगी एकटीच पाहुण्याबरोबर राहते, पण गोष्टी तिथेच संपत नाहीत त्या दोघांबरोबरही अनेक घडामोडी घडत राहतात.

काहीसे वेगळ्या धाटणीचे असे हे कथानक. तुलनेने मर्यादित कलाकार आणि अनेक शहरांमधून घडणारा प्रवास मांडणारे कथानक यात आहे. एकाच वेळी भ्रमंती आणि त्याच वेळी मानवी स्वभावातील कंगोरे दाखवणारे अशी ही कथेची मांडणी आहे. दीड-दोन तासांच्या अवधीत काही प्रमाणात बांधून ठेवणारे अशी ही वेबफिल्म आहे. मुख्यत: साचेबद्धपणा टाळणारे चित्रण ही याची जमेची बाजू आहे. बहुतांशपणे बेकायदेशीर म्हणता येईल अशा घटनांची ही कथा सरळ साध्या पद्धतीने सांगणे आणि त्याच वेळी ती कंटाळवाणी होऊ  न देणे हे येथे महत्त्वाचे आहे. ढिगाने बनावट पासपोर्ट, बनावट व्हिसा तयार केले जातात. पैशाच्या उलाढाली होतात. पण उगाचच आविर्भाव दाखवत काहीतरी जगावेगळे करण्याचा आव त्यात दिसत नाही.

अनेक शहरांत आणि हॉटेल्समधून चित्रीकरण केले असल्यामुळे पाश्र्वभूमी उत्तम लाभली असली तरी त्यात कॅमेऱ्याची सफाई हादेखील भाग तेवढाच महत्त्वाचा आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रवास हा खासगी स्लीपर बसगाडीने होतो. चित्रीकरणासाठी अतिशय गैरसोयीचे असे हे ठिकाण आहे. त्या प्रवासातील संवाद इतक्या व्यवस्थितपणे टिपले आहेत की कथानक पुढे नेणाऱ्या या संवादाबरोबर प्रवासाचीदेखील जाणीव होत राहते. हाच प्रकार अगदी साध्या छोटय़ा हॉटेलपासून ते राजवाडय़ातील हॉटेल ते गोव्यातील मस्त होम स्टेपर्यंतच्या चित्रीकरणास लागू होतो. त्या त्या हॉटेलप्रमाणे प्रसंगाचा, चित्रीकरणाचा पैसा बदलत जातो.

मात्र त्याचबरोबर काही प्रसंग अगदीच बाळबोध वाटावे असेदेखील झाले आहेत. सीमेवरील सुरक्षा रक्षकांना अगदीच वेडय़ात काढल्यासारखे झाले आहे. पाहुणा आणि नवरी मुलगी कोणत्याही पद्धतीने परदेशी पर्यटक वाटत नसताना आणि भारतीयच दिसत असूनदेखील प्रत्येक हॉटेलमध्ये त्यांच्याकडून थेट पासपोर्टची विचारणा केली जाते ही जरा अतिशयोक्तीच आहे. सुरक्षा रक्षकाच्या खुनाचा प्रसंग आणि नंतरचा गदारोळ इंटरनेटवर पाहून बिचकलेले दोघेहीजण कसलीच सावधानता बाळगत नाहीत हेदेखील पटत नाही. योगायोग संकल्पनेचा वापर जरा अधिकच प्रमाणात झाला आहे हे मात्र नक्की.

राधिका आपटेने यात नवरीची भूमिका केली असली तरी तिला तसा त्यात फारसा वाव नाही. किंबहुना तिच्याकडून फार वेगळा काही अभिनय केलेलाही पाहायला मिळत नाही. फार फार तर कथानकातील काही कलाटण्या तिच्या भूमिकेशी निगडित आहेत इतपतच. तुलनेने लग्नातील पाहुण्याची निर्विकार भूमिका देव पटेलने चांगली वठवली आहे. फार वाहवत न जाता सरळ आणि व्यवहारी विचार करणारा पाहुणा त्यातून व्यवस्थित समोर येतो. त्याच नावाने चित्रपट असल्यामुळे त्याच्याच भोवती चित्रपट व्यवस्थित फिरत राहतो. एक वेब फिल्म म्हणून हे कथानक एकदम चपखल असेच आहे.

वेडिंग गेस्ट

ऑनलाइन अ‍ॅप – अ‍ॅमेझॉन