सिनेमांचे, अभिनेत्यांचे चाहते म्हणजेच फॅन ही एक वेगळीच जमात आहे. आपल्या आवडत्या कलाकारांसाठी ही फॅन मंडळी अगदी वाट्टेल ते करायला तयार असतात.

एक काळ होता जेव्हा बॉलीवूडमधल्या प्रत्येक ताऱ्याचा एक स्वत:चा चाहतावर्ग असायचा. तो चाहतावर्ग (फॅन फॉलोइंग) त्या ताऱ्याचा किंवा तारकेचा कोणताही चित्रपट तितक्याच उत्साहाने आणि कौतुकाने पाहायला जायचा. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या सिनेमाचं कौतुक कोणी केलं नाही तर त्या चाहत्याला अतीव राग यायचा. अमिताभचा सिनेमा म्हणजे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे आणि कोणी वाईट बोललं तर मात्र तो मित्र असेल तरी थेट वैरीच होऊन जायचा. ‘माझ्या’ अमिताभला काही बोलायचं नाही यावरून मित्रामित्रांत भांडणं व्हायची. माधुरी आवडत नाही म्हणजे आंबा आवडत नसलेल्या माणसाकडे पाहिल्यासारख्या लोकांच्या प्रतिक्रिया असायच्या. समोरचा माणूस किती प्रचंड अरसिक आहे हे दाखवून द्यायची अशी उत्तम संधी समजून कोणीही समोरच्याला ‘शिकवणं’ सोडायचं नाही. आपल्या आवडत्या स्टारचं वकीलपत्र घेतल्यासारखे त्याचे फॅन्स त्याचं समर्थन करत असायचे.

आजही यात बदल काहीच झालेला नाही. अमिताभच्या जागी शाहरुख किंवा सलमान आणि माधुरीच्या जागी प्रियांका किंवा दीपिका एवढाच त्यातला फरक. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला कोणी काही बोललेलं आजही कोणालाच चालत नाही. मात्र एवढा सुज्ञपणा नक्की आलेला आहे की त्याचा चित्रपट एक कलाकृती म्हणून फारसा बरा नसेल तर तेही खिलाडूपणे स्वीकारलं जातं.  अक्षयकुमारचा फॅन असणाऱ्याने त्याचा सिनेमा पाहिला नाही तर चूक झाली आहे असं त्यांना वाटतं.

या आवडण्याला कारण म्हणजे केवळ एखाद्या अभिनेत्याचा अभिनय नसतो तर त्यात अनेक आवडीनिवडी दडलेल्या असतात. कोणाला रणबीर कपूर त्याच्या स्माइलसाठी आवडत असतो तर कोणाला हृतिक त्याच्या डान्ससाठी, कोणाला आयुषमान खुराना त्याच्या गालावरच्या खळीसाठी आवडतो तर कोणाला सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या डोळ्यांसाठी! आवडता अभिनेता म्हणण्यापेक्षा आवडता बॉलीवूड स्टार हा शब्द खरं तर जास्त योग्य ठरतो. आवडता स्टार ठरवण्यात कोणी फार चोखंदळपणे विचार करत नाही. मुलींना आवडणारे हिरो हे अनेकदा पहिल्यांदा पाहून जो हिरो सर्वात ‘भारी’ वाटतो तो आवडतो आणि मुलांसाठी जी हिरोईन पहिल्यांदा पाहूनच ‘दिल जीत लेती है’ तीच आवडती हिरोईन होऊन जाते. यात हिरोईनचं वय किंवा हिरोची प्रत्यक्ष आयुष्यातली गर्लफ्रेण्ड वगैरे आड येत नाही. हिरोला त्याच्या गर्लफ्रेण्डसकट आणि हिरोईनला तिच्या मुलाबाळांसकट आवड म्हणून स्वीकारलेलं असतं.

आवडत्या स्टारकडे पाहून बॉलीवूड सिनेमा पाहणारा वर्ग मोठा असला तरी त्या स्टारचा प्रत्येक चित्रपट चांगला असतोच असं नाही, हे त्याचे फॅन्सही मान्य करतात. त्यामुळे काही दर्जाचा चित्रपट पाहायचा असेल तर हा वर्ग अनेक वेळा हॉलीवूड चित्रपटांचा मार्ग निवडतो. कोणत्याही बॉलीवूड मारामारीपेक्षा हॉलीवूडमधली मारामारी त्यांना अधिक खरी वाटते. त्यामुळे जो वर्ग ‘ब्रदर्स’ केवळ सिद्धार्थ किंवा अक्षयसाठी बघतो किंवा ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ फवाद खानसाठी बघतो, तोच वर्ग दर्जाच्या कलाकृतींसाठी मिशन इम्पॉसिबल, इंटरस्टेलर आणि रेव्हेनंटच बघतो. बॉलीवूडमधल्या अनेक हिरो-हिरोईनचं कौतुक हे प्रामुख्याने त्यांच्या लुक्ससाठी होतं तर हॉलीवूडमधल्या अभिनेत्यांचं कौतुक हे त्यांच्या अभिनयासाठी, त्यांच्या कामासाठी होतं. जो आपल्या आवडत्या स्टारसाठी अगदी काहीही पाहायला तयार असतो तोच तरुण वर्ग सुंदर चित्रपट म्हणून हॉलीवूडकडे वळतो.

ज्या प्रमाणात बॉलीवूडसृष्टीतील स्टार्सच्या भोवती हे ग्लॅमर आणि फॅन्सचं वलय असतं ते तुलनेने मराठी चित्रपटसृष्टीत कमी आढळतं. मराठी अभिनेत्यांचं तरुणांना कितीही कौतुक असलं तरी केवळ त्या स्टारचा चित्रपट म्हणून पाहायला थिएटरमध्ये गर्दी केली आहे, शिटय़ा मारल्या आहेत किंवा अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ पाहिला आहे असं चित्र फार कमी प्रमाणात बघायला मिळतं. मराठी चित्रपटांना तरुण प्रेक्षक तेव्हाच जातो जेव्हा त्याची प्रचंड ‘हवा’ निर्माण केली गेली असेल किंवा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं खूप ठिकाणांहून कौतुक झालं असेल. याउलट अक्षयकुमारच्या ‘जॉली एल.एल.बी.टू’साठी किंवा सलमानच्या ‘सुलतान’साठी ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’चं बुकिंग करण्यासाठी लोक धडपडतात. जणू काही त्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो आपण नाही पाहिला तर आपल्याला पाप लागेल किंवा सिनेमाच चालणार नाही अशी धारणा असल्यासारखे ते गर्दी करतात.

गेल्या काही वर्षांत बॉलीवूडमधील चित्रपटांचा चेहरामोहरा बदलतोय तसाच बॉलीवूड स्टार्सची प्रतिमाही बदलते आहे. सुरुवातीला केवळ अ‍ॅक्शन चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारने ‘स्पेशल छब्बीस’ आणि ‘बेबी’सारखे चित्रपट देऊन सगळ्याच तरुणाईचं मन जिंकून घेतलं. ‘हॉलीवूड स्टाइलचे चित्रपट आले, गाणी नसली, कथा पटापट पुढे सरकली की चित्रपट बघायलाही उत्साह येतो’ अशा मतांमुळे अक्षयकुमारचा एकही गाणं नसलेला ‘बेबी’ तरुणांना प्रचंड आवडला, तरुणांनी तो डोक्यावर घेतला. टिपिकल देशभक्ती दाखवण्याऐवजी ‘एअरलिफ्ट’सारख्या चित्रपटातून सगळ्याच तरुणाईचा विचार प्रातिनिधिक स्वरूपात पुढे आला आणि त्याच वेळी तो विचार कसा चुकीचा होता हेसुद्धा त्यानेच दाखवून दिलं. जो प्रतिसाद अक्षयकुमारच्या ‘हाउसफुल’च्या सीरिजला मिळाला तितकाच, किंबहुना जास्तच, त्याच्या ‘बेबी’ आणि ‘एअरलिफ्ट’ला मिळाला. ज्यांना चित्रपटाच्या कथेत आणि मांडणीत रस आहे अशा सगळ्या थोडय़ा विचारी तरुण वर्गाने टिपिकल नसलेलेच चित्रपट उचलून धरले. त्यामुळेच केवळ शाहरुख खान आहे म्हणून नव्हे तर नवाजुद्दीन सिद्दिकी आहे म्हणजे चित्रपट कदाचित काही वेगळा असेल, चांगला असेल अशा धारणेने तरुणांनी ‘रईस’ बघितला तर कोणताही तथाकथित ‘हिरो’ नसताना केवळ कथा, सादरीकरण आणि नसिरुद्दीन शहाचा अभिनय यामुळे ‘द वेनस्डे’ तरुणाईला प्रिय झाला.

तरुणाईचा प्रतिसाद टिपिकल फिल्मी चित्रपटांना मिळतो त्याच प्रमाणात त्यांची पसंती आशयघन चित्रपटांना आणि विचारांशी जुळणारी कथानकं असणाऱ्या चित्रपटांना मिळते. नसिरुद्दीन शहाच्या ‘द वेनस्डे’ या चित्रपटाची कथाही अशीच सर्वसामान्य तरुणांच्या मनातली खळबळ दाखवणारी होती आणि प्रत्येकाच्या मनात येऊन गेलेला विचार प्रकट करणारी होती. या चित्रपटाला कोणत्याही हिरोचं वलय नसताना तरुणांनी डोक्यावर घेतलं. कारकीर्दीचा सुरुवातीचा काळ सोडता आमिर खानने नेहमीपेक्षा ‘आउट ऑफ द बॉक्स’ चित्रपट दिले आणि तरुणाईने ते उचलून धरले. त्याने ‘फना’ या चित्रपटात दहशतवाद्याची भूमिका केली तेव्हा त्याचे फॅन्स नाराज झाले आणि कथानक कितीही चांगलं असलं तरी त्या चित्रपटाला तरुणांनी फारसा उत्साही प्रतिसाद दिला नाही. आपल्या आवडत्या स्टारने थेट दहशतवाद्याची भूमिका करावी हे त्याच्या निष्ठावान फॅन्सना अजिबात न आवडल्याने त्याचा ‘फना’ तरुणाईने जवळजवळ वाळीत टाकला.

आजची तरुणाई कितीही हुशार, सारासार विचार करणारी, प्रॅक्टिकल असली तरीही हे ‘फॅनत्व’ काही कमी होत नाही. बॉलीवूड पूर्वीपासूनच केवळ ‘फेस व्हॅल्यू’वर सिनेमे बनवत आलेलं आहे. अमिताभपासून ते रणबीपर्यंत अनेकांचे अत्यंत साधारण चित्रपट हे केवळ हिरो किंवा हिरोईनच्या ‘ऑरा’वर नफा कमवत आले आहेत. तरुणाईचा सारासार विचार हा सिनेमा बघण्यापासून त्यांना कधीच अडवत नाही; मात्र सिनेमाचं कौतुक करताना तरुणाई सिनेमाचा एक कलाकृती म्हणून सर्वागांनी विचार नक्कीच करते. ‘फॅनत्व’ जपण्यासाठी कोणत्याही काळातली तरुणाई पॉकेटमनीचाही विचार न करता आवडत्या स्टारचा सुमार चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करते आणि आपल्या स्टारशी एकनिष्ठ राहिल्याच्या समाधानात त्याच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहाते.

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा