News Flash

Movie Review: जाणून घ्या, कसा आहे सोनम-दुलकर सलमानचा ‘द झोया फॅक्टर’

हा चित्रपट काही अंशी प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळत आहे

क्रिकेट आणि स्वत: ला लकी समजणाऱ्या झोया सिंग सोलंकी या दोघांच्या भोवती फिरणारा ‘द झोया फॅक्टर’ हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता दुलकर सलमान यांची उत्तम केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये सोनमपेक्षा दुलकर सलमानने प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या. अभिषेक वर्मा यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातून झोया सिंग सोलंकी या राजपूत मुलीची कथा उलगडण्यात आली आहे.

कथा : ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाची संपूर्ण कथा झोया सिंग सोलंकी या मुलीच्या भोवती फिरताना दिसत आहे. ज्या दिवशी झोयाचा जन्म होतो, त्याच दिवशी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून झोयाला तिचे वडील ( संजय कपूर) त्यांचा लकी चार्म मानतात. विशेष म्हणजे सगळ्यांसाठी लकी असलेली झोया स्वत: साठी मात्र काही अंशी अनलकी ठरत असते. जीवनाचा हा प्रवास सुरु असतानाच झोया एका अॅड एजन्सीमध्ये काम करत असते. मात्र या ठिकाणीही तिला सतत वरिष्ठांकडून ओरडा मिळत असतो. त्यातच तिचा प्रियकरासोबत ब्रेकअपही होतो. हे सारं दृष्टचक्र मागे लागलं असतानाच एक दिवस अचानकपणे झोयाची भेट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार निखील खोडा (दुलकर सलमान) याच्यासोबत होते. विशेष म्हणजे कामानिमित्त झोयाची भारतीय संघाशी भेट होते. या भेटीमध्ये झोया तिच्या लकी असण्याविषयी टीम इंडियाल सांगते. मात्र निखीलचे विचार झोयाच्या विरुद्ध असतात. तो लकी चार्मपेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा असतो, आणि इथूनच सुरु होतो, चित्रपटातील या दोघांचा खरा प्रवास. त्या दोघांमधील वाद, त्यांच्यात खुलणारं प्रेम. त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहावा लागेल.

रिव्ह्यु : ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाची कथा अत्यंत साधी आणि सरळ आहे. अनेक वेळा चित्रपटामध्ये मजेशीर किस्सेदेखील घडले आहेत. इतकंच नाही तर चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेली क्रिकेट टीम पाहून प्रत्येक क्षणाला भारतीय क्रिकेट संघाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी चित्रपटातील बऱ्याचशा भागांमध्ये क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचं एकंदरीत दिसून येतं. चित्रपटामध्ये तीन गाण्यांचा समावेश करण्यात आला असून ही गाणी काही अंशी प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच सोनमपेक्षा दुलकर सलमानचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. सोनम आणि दुलकर सलमान व्यतिरिक्त संजय कपूर, सिकंदर खेर, अंगद बेदी आणि मनु ऋषि यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य पद्धतीने न्याय दिला आहे.

दरम्यान, अभिषेक शर्मा यांनी ‘द झोया फॅक्टर’पूर्वी ‘तेरे बिन लादेन’, ‘द शौकिन्स’ आणि ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. अभिषेक यांच्या चित्रपटांमध्ये लव्हस्टोरीमध्ये मेलोड्रामा फारसा नसल्याचं पाहायला मिळतं.

स्टार :

अडीच स्टार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 1:10 pm

Web Title: the zoya factor movie review sonam kapoor dulquer salmaan film ssj 93
Next Stories
1 सावरकर-मंगेशकर कुटुंबियांचे संबंध कसे होते? लता दीदींनी केलं मोठं विधान
2 आगामी चित्रपटासाठी अभिनेत्रीने केला लूक चेंज, घेतला ‘प्रोस्थेटिक मेकअप’चा आधार
3 Happy Birthday Mahesh Bhatt : ‘या’ अभिनेत्रीसाठी महेश भट्टने बदलला होता धर्म