करोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे अगदी सेलिब्रिटींनी देखील प्राण गमावले आहेत. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीचं नाव जोडलं गेलं आहे. प्रसिद्ध रंगभूमी दिग्दर्शक पीतांबरलाल रजनी यांचं करोना विषाणूमुळे निधन झालं आहे. ते ८० वर्षांचे होते. तमिळनाडूमध्ये उपचारादरम्यान त्यांच निधन झालं.

पीतांबरलाल रजनी एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, आणि लेखक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १०० पेक्षा अधिक नाटकांच्या संहिता लिहिल्या आहेत. व त्यांचं दिग्दर्शन केलं आहे. पीतांबरलाल रजनी रंगभूमी व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रातही कार्यरत होते. गेली ३० वर्ष ते ‘मद्रास खिश्चन महाविद्यालयात’ इंग्रजीचे शिक्षक म्हणून विद्यार्थांना शिकवत होते. त्यांचे विद्यार्थी त्यांना लाडाने ‘पा’ म्हणून हाक मारायचे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

१९ जुलै ते ४ ऑगस्ट या १७ दिवसांपैकी १५ दिवस करोनारुग्णांची दैनंदिन वाढ ४० हजारांहून अधिक राहिलेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही मोठी राज्येच नव्हे तर छोटय़ा राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत. गोवा सात हजार, त्रिपुरा ५.५ हजार, मणिपूर तीन हजार, नागालँड २५००, पुडुचेरी या राज्यांमध्ये चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मेघालय, सिक्कीम, अंदमान-निकोबार या तीनच राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.