रुपेरी पडद्यावर पंजाबी, बंगाली, दक्षिण भारतीय अशा विविध व्यक्तिरेखा रंगवणारी अभिनेत्री विद्या बालन मराठी चित्रपटात काम करायला तयार आहे. मात्र, त्यासाठी तिची एकच अट आहे आणि ती म्हणजे भाषेवरील प्रभुत्व! ‘मला सध्या फक्त सरल मराठी बोलता येते, स्वतच्या आवाजात मराठीतील संवाद डब करण्याची तयारी होईल त्याचवेळी मराठी चित्रपट करेन’, असे विद्या ठणकावून सांगते. ‘बॉबी जासूस’च्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पहिली महिला गुप्तहेर रंगवणारी अभिनेत्री म्हणून विद्या बालन सध्या चर्चेत आहे. सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याने इतर कशावरही बोलू न इच्छिणारी विद्या मराठी चित्रपटांचे नाव काढताच खूष होते. या पाश्र्वभूमीवर तिने ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. गेल्या काही वर्षांत मराठीत खूप चांगले चित्रपट आल्याचे कौतुक तिने यावेळी केले. हिंदीबरोबरच प्रादेशिक चित्रपटांमध्ये आशय, अभिनयाच्या बाबतीत गुणवत्ता दिसून येते, असे विद्याचे म्हणणे आहे. मात्र, प्रादेशिक चित्रपटांची तुलना हिंदीशी करणे योग्य नाही, असेही तिला वाटते. मराठीतील अनेक चित्रपटांचे प्रस्ताव आले असल्याचे ती आवर्जून सांगते. मात्र, मराठी भाषेवर हवे तसे प्रभुत्व आले नसल्याचे विद्याने सांगितले. जितके सहज शब्द आहेत ते मला बोलता येत असल्याचे ती म्हणाली. सशक्त पटकथा आणि तितकीच सक्षम व्यक्तिरेखा असल्याशिवाय आपण चित्रपट करत नाही. त्यामुळे अशा चांगल्या चित्रपटासाठी योग्य संवाद बोलता आले नाहीत, तर ते चित्रपटावर अन्यायकारक ठरेल, असे आपल्याला वाटत असल्याचे विद्याने स्पष्ट केले.

‘बालक पालक’, ‘यलो’ आणि ‘फँ ड्री’ हे चित्रपट मला पहायला मिळाले नाहीत. मात्र, मी या चित्रपटांच्या डीव्हीडी मागवल्या असून ‘बॉबी जासूस’च्या प्रदर्शनानंतर वेळात वेळ काढून हे चित्रपट पाहणार आहे.
विद्या बालन, अभिनेत्री