भारतात मोठ्या प्रमाणावर असहिष्णुता अस्तिवात असल्याचे मत बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याने सोमवारी व्यक्त केले. शाहरूख खानचा आज ५०वा वाढदिवस आहे. ‘इंडिया टुडे’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ट्विटर टाऊनहॉल या कार्यक्रमात शाहरूख बोलत होता. यावेळी शाहरूख खानला देशातील वाढत्या असहिष्णुतेविषयी विचारण्यात आले असता त्याने भारतीय समाजात असहिष्णुता मोठ्याप्रमाणावर पसरली असल्याचे मत व्यक्त केले.
भारतात देशभक्त असलेल्या व्यक्ती निधर्मीवादाला विरोध करून सर्वात मोठी चूक करतात, असेही शाहरूखने यावेळी सांगितले. देशातील वाढत्या असहिष्णुतेचा निषेध म्हणून समाजातील अन्य घटकांप्रमाणे तू देखील सरकारला पुरस्कार परत करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता, हो प्रतिकात्मकरित्या निषेध व्यक्त करण्यासाठी मी पुरस्कार परत करू शकतो, असे शाहरूखने सांगितले. माझ्या मते देशात टोकाची असहिष्णुता अस्तित्वात असल्याचे त्याने यावेळी म्हटले. गेल्या काही दिवसांत देशातील असहिष्णुतेचा निषेध म्हणून अनेक लेखक, कलाकार आणि शास्त्रज्ञांनी पुरस्कार परत केले आहेत. या कार्यक्रमात शाहरूखने भारतात एक मुस्लिम व्यक्ती म्हणून त्याला सामोरे जावे लागलेल्या अनुभवांविषयही सांगितले. माझ्या देशभक्तीविषयी कोणीही शंका उपस्थित करू शकत नाही, मुळात ते अशी हिंमतच कशी काय करू शकतात, असा सवाल शाहरूखने उपस्थित केला. त्यामुळे आता शाहरूख खानच्या भूमिकेविषयी सरकार कशाप्रकारे व्यक्त होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.