कॉलेज आठवणींचा कोलाज

मयूरी देशमुख

कॉलेजच्या आठवणी माझ्या मनाच्या खूप जवळच्या आहेत. एकतर मला खूप अनुभव आले. खूप शिकता आले. मला आठवतंय एकदा एक लेक्चर सुरू होते, जे मला आणि माझ्या मैत्रिणींना खूप कंटाळवाणं वाटत होतं. आम्हाला एक कल्पना सुचली. माझ्या एका मैत्रिणीनं तिला उलटीसारखं होत असल्याचं भासवलं, दुसरी मैत्रीण तिच्या पाठोपाठ गेली. बाथरूममधून आल्यावर तिने सरांना हिला कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, असं सांगितलं. जे आमच्या कॉलेजच्या परिसरातच होते. त्यासाठी आम्हाला मयूरीची गरज आहे, कारण तिच्याकडे गाडी आहे. असं करत आम्ही तिघी वर्गाबाहेर पडलो आणि थेट जवळच्या मॉलमध्ये गेलो. तिथे भरपूर धमाल केली. फोटो काढून आम्ही ते फेसबुकवर पोस्ट केले आणि त्या फोटोवर त्याच सरांचं लाईक आले आणि ‘छान दिसताय’ अशी कमेंटही आली. त्यांना जराही कल्पना नव्हती, की आम्ही त्यांचंच लेक्चर बंक करून मॉल फिरत होतो. हा किस्सा आम्ही आजही अनेकदा आठवून हसतो.

कॉलेजच्या आठवणी या नेहमीच खास असतात. त्यातही मी तीन महाविद्यालयांमधून माझं शिक्षण पूर्ण केलंय. त्यामुळे माझ्याकडे कॉलेजशी जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी आहेत. चर्चगेटच्या के. सी. कॉलेजमधून मी अकरावी-बारावी केलं. त्यानंतर मी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेजमधून दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मी मास्टर्स इन थिएटर आर्ट्स पूर्ण केलं. कॉलेजचा पहिला दिवस आजही मला लख्ख आठवतोय. मी जेव्हा के. सी. कॉलेजला पहिल्यांदा गेले होते, तेव्हा माझ्यात जरा न्यूनगंडच होता. एक तर तो परिसर खूप उच्चभ्रू, तेथील लोकांचे राहणीमान वेगळे आणि त्यात आपण मध्यमवर्गीय मुलगी, जी फॅशनबाबतीत तितकीशी सजग नाही. चष्मा लावून कॉलेजला जाते. पहिल्या दिवशी मी माझ्याकडे कोणी बघणार नाही, याची मी पुरेपूर काळजी घेत होते. हा दिवस कधी संपतोय, असं झालं होतं. त्यात शाळेतून कॉलेजला गेल्यावर रॅगिंग होते, हे सुद्धा ऐकून होते. त्यामुळे कॉलेजबद्दल मला खूप उत्सुकता अशी नव्हतीच. एक उदासीनता होती. परंतु हळूहळू नवीन मित्रमैत्रिणी होऊ  लागल्या आणि मी तिथे रुळले. बारावी झाल्यानंतर मी दंतवैद्यकीयच्या अभ्यासासाठी डी. वाय. पाटीलला प्रवेश घेतला.

एकदा आम्ही वेळात वेळ काढून पावसाळ्यात लोणावळ्याला एकदिवसीय सहलीला जाण्याचं ठरवलं. पहिल्यांदाच सगळे मित्रमंडळी गाडीनं बाहेर जाणार होतो. पावसातील छोटय़ा छोटय़ा मजा आम्ही त्या वेळी अनुभवल्या. भुट्टा खाणं, मॅगी खाणं, रूफ कारमध्ये उभं राहून तोंडावर बोचणारा तो वारा अनुभवणं, कॉलेजमध्ये जी मस्ती करायची असते, ती आम्ही तेव्हा अनुभवली होती आणि ही आठवण आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. कारण त्याच्यानंतर असं वेळ काढून फक्त पावसाचा आनंद लुटण्यासाठी खास जाणं असं कधी झालंच नाही.  डी.व्हाय.चा शेवटचा दिवस म्हणण्यापेक्षा मी शेवटचा आठवडा म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून नेरुळला जाणारा आमचा दहा जणांचा एक ग्रुप होता. त्यांनी असं ठरवलं होतं की, हा शेवटचा आठवडा कॉलेजमधून परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचल्यावर आपण रोज दोन ते तीन तास कुठेतरी फिरायचं आणि आम्ही तसं केलंही. त्यामुळे घरच्यांची बोलणी ऐकली तरीही हा एक आठवडा आम्ही एकत्र घालवला होता. कारण प्रत्येकाला आपण वेगळे होणार असल्याची, कामात व्यस्त होणार असल्याची जाणीव असल्यानं आमच्यासाठी हा आठवडा खूप अविस्मरणीय होता. कॉलेजमध्ये असताना मी खवय्येगिरीही खूप केली आहे. मुळात मी फूडी आहे. जवळपास वयाच्या बाविसाव्या वर्षांपर्यंत मी चर्चगेटला राहिली आहे आणि तिथे गुजराथी आणि मारवाडी लोक खूप आहेत. त्यात हे लोक फूडी असतात आणि माझा मित्रपरिवार हा गुजराथी आणि मारवाडी असल्यानं ते शाकाहारी होते. आणि त्यात मी सुद्धा शाकाहारी. त्यामुळे आम्ही मुंबईतील शाकाहारी ठिकाणं अक्षरश: पालथी घातली आहेत. दंतवैद्यकीयला आमचं सकाळचं कॉलेज असायचं आणि मध्ये वीस मिनिटांचा ब्रेक असायचा. तेव्हा आम्ही कॉलेजच्या समोर पोहे आणि इडली सांबारच्या गाडय़ा असायच्या, तिथे जायचो. तिथली चव इतकी अप्रतिम असायची की आम्ही रोज पोहे आणि इडली सांबार खायचो, तरीही कधी कंटाळा नाही यायचा.   त्यानंतर करिअरच्या दृष्टीने मी मुंबई विद्यापीठात मास्टर्स इन थिएटर आर्ट्ससाठी प्रवेश घेतला. मास्टर्स इन थिएटर आर्टस् करत असताना आम्ही एक नॅशनल थिएटर फेस्टिवल महारंगाचे आयोजन केले होते. त्या वेळी आम्ही भारतातील सगळ्यात उत्कृष्ट  अशा थिएटर आर्टिस्टना आमंत्रित केले होते. त्यांच्या राहण्याची, नेण्या-आणण्याची सोय, कोणकोणत्या विषयावर भाषण करणार, कोणते विषय असणार, या सगळ्याची योजना मी आणि माझ्या टीमनं केली होती. तो एक खूप अविस्मरणीय अनुभव होता. त्   माझ्या कॉलेज जीवनातील आणखी एक गमतीदार किस्सा म्हणजे आज ज्या नाटकाने मला इतकी ओळख दिली, प्रसिद्धी दिली ते नाटक ‘डिअर आजो’ जे मी थिएटर आर्टस्च्या दुसऱ्या वर्षांला असताना लिहिलं होतं. ज्याला अनेक नामांकनं मिळत आहेत, पुरस्कार मिळत आहेत. त्यामुळे इथून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

शब्दांकन : मितेश जोशी