इंजिनिंअरिंगमध्ये शिक्षण घेणं आणि नंतर नोकरी करणं हे कोणत्याही विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. काही पालक तर त्यांच्या मुलांना आयआयटी- जेईई आणि एआयईईईसाठी प्रवेश मिळावा म्हणून नववी इयत्तेपासूनच तयारी करायला लावतात. सुरक्षित भविष्यासाठी योग्य शिक्षण असणं हे आवश्यकच आहे. पण नशीब आपल्याला कधी कोणत्या मार्गाला घेऊन जाईल हे काही सांगता येत नाही. बी.टेक केल्यानंतर सर्वसामान्य नोकरी करण्यापेक्षा काहींनी वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग एवढा वेगळा होता की त्यांनी चक्क चंदेरी दुनियेतच पाऊल टाकलं. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच काही इंजिनिअर्सची ओळख करून देणार आहोत.

‘हे बेबी’मधील ‘ऐंजल’ आठवते का?

विकी कौशल-
विकी कौशलने २००९ मध्ये मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. या ‘मसान’ अभिनेत्याने करिअरच्या सुरूवातीला चांगली नोकरी मिळवून करिअर घडवण्याचे स्वप्न पाहिले होते. पण नंतर ठराविक तासांची नोकरी करणं हे त्याला फारसं पसंत पडलं नाही आणि त्याने बॉलिवूडची वाट धरली.

क्रिती सनॉन-
क्रितीने इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेश इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली आहे. तिने जेपी इन्स्टिट्युट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नोएडा येथून पदवी संपादन केली. पदवीनंतर २०१४ पासून मॉडेलिंग करणाऱ्या क्रितीने ‘हिरोपंती’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सुशांत सिंग राजपूत-
सुशांतने सिनेमात साकारलेली एमएस धोनीची व्यक्तिरेखा आजही कोणी विसरू शकत नाही. या सिनेमासाठी त्याचे फार कौतुकही झाले. पण तुम्हाला माहित आहे का, की हा ऑनस्क्रिन धोनीही इंजिनिअर आहे. सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (आत्ताचे दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी) येथून मेकॅमिकल इंजिनिअरिंग केले आहे. एवढेच काय तर ऑल इंडिया इंजिनिअरिंग एण्ट्रन्स अॅक्झाम (एआयईईई) मध्ये सुशांतचा सातवा क्रमांक आलेला. पण इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना त्याला कॉलेजमधून काढण्यात आले. यानंतर त्याने मनोरंजन क्षेत्रातच आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

फवाद खान-
‘हमसफर’ या मालिकेतून लाखोंच्या हृदयात आपले स्थान प्रस्थापित करण्यापूर्वी फवाद खानही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. फवाद लाहोर येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्युटर अॅण्ड इंजिनिअरिंग सायन्स (एनयुसीईएस) या कॉलेमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकत होता. पण काही दिवसांनी आपण कोडिंगमध्ये चांगलं काम करु शकत नाही याची जाणीव फवादला झाली आणि तो अभिनयाकडे वळला.

आर माधवन- 
आर माधवन याने २००९ मध्ये आलेल्या ‘३ इडियट्स’ या सिनेमात इंजिनिअर विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. पण खऱ्या आयुष्यातही तो स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. त्याने कोल्हापुर येथील राजाराम कॉलेजमधून इंजिनिअरिंग केले आहे.

कार्तिक आर्यन-
‘प्यार का पंचनामा’ या सिनेमामुळे कार्तिक आर्यन हे नाव साऱ्यांच्याच परिचयाचे झाले. कार्तिकही इंजिनिअर आहे. मुंबईमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्याने अभिनयाचे धडेही गिरवायला सुरूवात केली होती.

तापसी पन्नू-
‘पिंक’, ‘नाम शबाना’ या सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने तापसीने अनेकांकडून शाबासकीची थाप मिळवली. पण तुम्हाला माहित आहे का? सिनेसृष्टीत येण्यापूर्वी तापसीने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले होते. तापसीने नवी दिल्ली येथून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केले आहे.

सोनू सूद-
‘दबंग’, ‘हॅप्पी न्यू इयर’ आणि ‘कुंग फू योगा’ या सिनेमात आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणाऱ्या सोनूने नागपूर येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केले आहे.

कादर खान-
ज्येष्ठ अभिनेते कादर खान हेसुद्धा इंजिनिअर आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी खान यांनी सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री घेतली होती. एवढेच नाही तर ते काही वर्षे मुंबईतील साबू सिद्दीकी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकवतही होते.

अमोल पराशर-
‘ट्रिपलींग’ या वेबसिरीजमुळे तरुणाईच्या गळ्यातला ताईत झालेला अमोल पराशर हासुद्धा इंजिनिअर आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. २००९ मध्ये आलेल्या रणबीर कपूरच्या ‘रॉकेट सिंग’ या सिनेमातही तो झळकला होता.