News Flash

२०२१मध्ये अजय मालामाल? या वर्षात बिग बजेट चित्रपटांचा पाऊस!

आज अजय देवगणचा वाढदिवस आहे...त्यानिमित्त जाणून घ्या त्याच्या कामाविषयी

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हा चित्रपटविश्वातला बिग बजेट कलाकार आहे. त्याने ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज त्याचा वाढदिवस आहे. त्याने वयाची ५२ वर्षे पूर्ण केली. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल!

२०२१ हे वर्ष अजय देवगणसाठी चांगलंच लाभदायक ठरणार असं चित्र दिसत आहे. त्याच्या निर्मिती संस्थेचे अनेक प्रोजेक्ट्स या वर्षात होणार आहेत त्यासोबतच तो स्वतःही अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अजयची निर्मिती तसंच अभिनेत्री रेणुका शहाणे हिचं दिग्दर्शन असलेला ‘त्रिभंगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अभिनेत्री आणि अजयची पत्नी काजोल, अभिनेत्री तन्वी आझमी, मिथिला पालकर तसंच कुणाल रॉय कपूर हे प्रमुख भूमिकेत दिसून आले. एकाच घरातल्या तीन पिढ्यांमधल्या महिलांच्या नात्याची ही कथा होती. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला.

१९९२च्या हर्षद मेहताच्या स्टॉक मार्केट घोटाळा प्रकरणावर आधारित असलेला ‘बिग बुल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याची निर्मिती अजय देवगणने केली आहे. यात अभिषेक बच्चन, निकिता दत्ता, इलियाना डिक्रुझ हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. करोना महामारीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.पण लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

हे झालं निर्मितीबद्दल…अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास अजय लवकरच रोहित शेट्टीच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तो आपल्या बाजीराव सिंघम या लोकप्रिय भूमिकेत असेल. करोना महामारीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शनही एका वर्षाहून अधिक काळ लांबलं आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातही अजय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप ही भूमिका गुलदस्त्यातच आहे. मात्र चर्चा आहे की, अजय एका गँगस्टरच्या भूमिकेत असेल. अभिनेत्री आलिया भट ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. तर दिग्दर्शक राजामौली यांचा बहुचर्चित चित्रपट ‘आर आर आर’ यातही अजय महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. यात अजयसोबत रामचरण, एनटी रामाराव, आलिया भट, ऑलिव्हिया मॉरिसन हे कलाकार पाहायला मिळतील.

आगामी ‘मैदान’ या चित्रपटात अजय फुटबॉल कोचची भूमिका साकारणार आहे. यात त्याच्यासोबत प्रियामणी, गजराज राव, रुद्रनील घोष हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. तर ‘भूजः द प्राईड’ या ऍक्शनपटात तो संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, प्रनिता सुभाष, नोरा फतेही यांच्यासोबत दिसेल. हा चित्रपट १९७० सालच्या भारत पाकिस्तान युद्धावरुन प्रेरित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही अजय आता उतरणार आहे.  अमिताभ बच्चन, राकुल प्रीत सिंग, अंगिरा धार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘मेडे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन तो करणार आहे. प्रसिद्ध युट्यूबर कॅरी मिनाटी या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मल्टी टास्किंग करणारा अजय सध्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यात अजयसोबत राकुल प्रीत सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा काम करत आहेत. पुढच्या वर्षी जानेवारीच्या शेवटापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल असा अंदाज आहे.

थोडक्यात काय तर अजयसाठी २०२१ हे वर्ष चांगलंच फायदेशीर ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2021 1:01 pm

Web Title: these are the upcoming projects of ajay devgan vsk 98
Next Stories
1 Birthday Special : कपिल शर्माच्या सर्वात महागड्या ५ गोष्टी, जाणून घ्या
2 “ते ऐतिहासिक होतं….”, बिग बी लवकरच लिहिणार लसीकरणाचा अनुभव
3 स्वरा भास्करचा ‘आफ्टर पार्टी’ डान्स, व्हिडीओ चर्चेत
Just Now!
X