सिनेमाचे जग म्हणजे अनेक गोष्टींची सरमिसळ. त्यात एक रंग होळीचा. बॉलिवूड सिनेमांतील गाणी असो किंवा दृश्ये होळीचा रंग दिसला नाही तर जणू या क्षेत्रातील झगमगच फिकी पडेल. बी-टाऊनचे कलाकारसुद्धा या सणाला एकत्र येऊन जल्लोषात पार्टी करतात. बॉलिवूडच्या मोठमोठ्या होळी पार्ट्या खूप आधीपासून चर्चेत राहिल्या. राज कपूर यांनी पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये होळी पार्ट्यांचा ट्रेण्ड सुरू केला असं म्हटलं जातं. त्यानंतर बऱ्याच कलाकारांनी ते फॉलो केलं. पण अशा अनेक पार्ट्या आहेत ज्या हळूहळू बंद झाल्या.

राज कपूर यांची होळी पार्टी-
बी-टाऊनची होळी पार्टी ही शोमॅन राज कपूर यांच्या होळी पार्टीच्या उल्लेखाशिवाय अपुरीच आहे. आर.के. स्टुडिओमध्ये जल्लोषात ही पार्टी व्हायची. बॉलिवूडचे अनेक कलाकार या पार्टीला एकत्र जमायचे. रंगपंचमीला सकाळपासून सुरू होणारी ही पार्टी संध्याकाळपर्यंत सुरू असायची. पण राज कपूर यांच्या निधनानंतर या पार्टीचं आयोजन करणं बंद झालं.

अमिताभ बच्चन यांची होळी पार्टी-
अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या बंगल्यावर होळी पार्टीचं आयोजन करण्यात यायचं. दिग्गज कलाकार या पार्टीत सहभागी व्हायचे. पण बिग बी यांनी २००७ मध्ये आईच्या निधनानंतर ही पार्टी बंद केली.

सुभाष घई यांची होळी पार्टी-
निर्माते सुभाष घई यांच्या मड आयलँड येथील बंगल्यावर होळी जल्लोषात साजरी व्हायची. पण जवळपास दहा वर्षांपूर्वी ही पार्टी बंद झाली.

यश चोप्रा यांची होळी पार्टी-
दिवंगत सिनेनिर्माते यश चोप्रा यांच्या यशराज स्टुडिओत होळी पार्टी व्हायची. पण त्यांच्या निधनांतर ही पार्टी बंद झाली.