विराट कोहली आणि अनुष्का शर्माने त्यांच्या लग्नाविषयी कमालीची गुप्तता बाळगली होती. लग्नानंतर दोघांनीही अधिकृत घोषणा करुन फोटोही शेअर केले. त्यानंतर दोघांचे साखरपुडा, हळद आणि लग्नाच्या विधीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. ‘विरुष्का’च्या लग्नाची जेवढी चर्चा होती तेवढीच चर्चा त्यांचा पोषाखाचीही होती. दोघांचाही पोषाख चर्चेचा विषय ठरत आहे. विराट आणि अनुष्काने त्यांच्या लग्नात जो ड्रेस घातला होता तो ड्रेस डिझाइन करायला कारागिरांनी फार मेहनत घेतली. या दोघांचा पोषाख एवढा का ट्रेण्डमध्ये येतोय याची कारणं पाहुया…

लग्नाच्या विधींना ९ डिसेंबरपासून सुरूवात झाली. एक कंटेनर भरून फूल मागवण्यात आली होती. लग्नात पारंपरिक सनई-चौघड्यांसह भांगडाही करण्यात आला. लग्नात दोघांनी जो ड्रेस घातला होता ते दोन्ही ड्रेस प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केले होते. स्वतः सब्यसाची म्हणाले की अनुष्काचा लेहंगा तयार करायला त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली.

अनुष्काचा लेहंगा तयार करायला तब्बल ६७ कारागीर लागले. या सर्व कारागिरांनी मिळून ३२ दिवसांमध्ये हा शाही लेहंगा तयार केला. फिकट गुलाबी रंगाच्या या लेहंग्यावरील खास नक्षीकाम कोणत्याही मशीनवर न करता हाताने केले आहे. हे तर झाले लेहंग्याचे वैशिष्ट्य, पण तिच्या दागिन्यांवरही विशेष मेहनत घेण्यात आली होती. पारंपरिक जडाऊ पद्धतीचे काम केलेले दागिने तिने परिधान केले होते. या दागिन्यात पैलू न पाडलेले खडे आणि जपानी मोत्यांचा वापर करण्यात आला.

विराटची शेरवानीही अनुष्काच्या लेहंग्याला साधर्म्य साधेल अशीत तयार करण्यात आली होती. अनुष्काच्या लेहंग्यासाठी फिकट गुलाबी रंगाची निवड केल्यावर विराटच्या शेरवानीसाठी पांढरा रंग निवडला. शेरवानीवर बनारसी नक्षीकामासोबत हातमागाचीही कारागिरी करण्यात आली. टसर फ्रॅब्रिकच्या स्टोलसह विराटने फिकट गुलाबी रंगाचा फेटा बांधला होता.

मेहंदी सोहळ्यातही विरुष्काच्या कपड्यांकडेच साऱ्यांचे लक्ष होते. यावेळी अनुष्काने गडद गुलाबी रंगालाच प्राधान्य दिले. ग्राफिक क्रॉप टॉपसह गुलाबी आणि केशरी रंगाचा सिल्कचा लेहंगा घातला होता. या लेहंग्यावरही कोलकाताची प्रसिद्ध ब्लॉक प्रिंट आणि हातमागाची कारागिरी करण्यात आली होती.

विराटने मेहंदी समारंभात खादीच्या सफेद कुर्त्यासोबत त्याच रंगाचा चुडीदार घातला होता. पण अनुष्काच्या ड्रेसला मॅचिंग म्हणून त्याने गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट वापरले होते.

साखरपुड्याला अनुष्काने मरुन रंगाची साडी नेसली होती. साडीवरील मोतीसह जरदोजी आणि मरोरीची कारागिरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दागिन्यांत तिने मोती आणि खड्यांची कारागिरी असलेला चोकर घातला होता. त्यालाच साजेसे स्टड कानातले, आंबाडा आणि त्याच्या बाजूला गुलाबाचं फूल माळलं होत. साखरपुड्याला विराटने व्हाइट शर्टवर निळ्या रंगाचा सूट घातला होता.

दागिन्यांत तिने २२ कॅरेट सोन्याचे झुमके घातले. या झुमक्यातही पैलू न पाडलेले खडे आणि जपानी मोत्यांचा वापर करण्यात आला. परिपूर्ण लूक दाखवण्यासाठी तिने पंजाबी चपलांनाच प्राधान्य दिले. या चपलांचीही विशेष गोष्ट म्हणजे त्यावर हाताने नक्षीकाम केले गेले होते.