अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही ‘ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’ असून तिनं निकला त्याच्या मनाविरुद्ध लग्न करायला भाग पडलं, यांसारखे आरोप करणाऱ्या लेखिकेला आणि तिचे विचार प्रकाशित करणाऱ्या मासिकाला प्रियांकानं सडेतोड उत्तर दिलं आहे. या गोष्टींना मी महत्त्व देत नाही मी सध्या जगातील सर्वात सुखी व्यक्ती असून माझा आनंद आता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असं तिनं म्हटलं आहे.

लग्नानंतर पहिल्यांदाच प्रियांका आणि निकनं दिल्लीतील एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्या दोघांच्या नात्याविषयी छापून आलेल्या लेखाबद्दल प्रतिक्रिया विचारली. पण या लेखावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नसून या गोष्टी माझ्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत. मी सध्या खुपच खूश असून कोणत्याही गोष्टी माझा आनंद आता हिरावून घेऊ शकत नाही असं प्रियांकानं म्हटलं आहे.

काय आहे ‘द कट’ मध्ये प्रकाशित झालेला लेख
प्रियांका- निकच्या लग्नानंतर लेखिका मारिहा स्मिथनं ‘Is Priyanka Chopra and Nick Jonas’s Love for Real?’ या मथळ्याखाली आक्षेपार्ह लेख लिहिला. या लेखात प्रियांकाचा उल्लेख ‘ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’ असा करण्यात आला. केवळ स्वत:च्या फायद्यासाठी आणि हॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवण्यासाठी निक जोनासशी लग्न केलं. निकच्या पैसे आणि प्रसिद्धीचा वापर करून तिला स्वत:चा फायदा करून घ्यायचा होता म्हणूनच तिनं स्वत:पेक्षा वयानं १० वर्षे लहान असलेल्या निकला आपल्या जाळ्यात अडकवलं. हे लग्न निकच्या मनाविरुद्ध झालं असून प्रियांकानं निकला स्वत:शी लग्न करण्यास भाग पाडलं होतं. हा लग्नसोहळा म्हणजे दोघांसाठी पैसे कमावण्याचा कार्यक्रम होता’ यांसारखे अनेक खटकणारे मुद्दे या लेखात मांडण्यात आले होते. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर जगभरातून द कट मासिकावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

‘द कट’नं मागितली माफी
या लेखामुळे ‘द कट’ मासिकाविरोधात जगभरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली. हा लेख सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत द कटनं तो लेख आपल्या वेबसाइटवरून काढून टाकला. या लेखातील विचार हे मासिकाचे नसून ते मारिहा स्मिथचे आहे . यातून कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो असं द कटनं म्हटलं आहे.