दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी आजपर्यंत अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच चाहते त्यांना ‘थलायवा’ असे म्हणतात. आज त्यांचा ६६वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आम्ही त्यांच्याबद्दलच्या काही दुर्मिळ गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

१. रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक १९७५मध्ये वयाच्या २५व्या वर्षी मिळाला. हा सिनेमा होता ‘अपूर्व रागंगल’ (Apoorva Raagangal). कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात रजनीकांत यांना केवळ १५ मिनीटांची भूमिका मिळाली होती.

२. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली. रावणाची व्यक्तिरेखा साकारायला त्यांना फार आवडायचे.

३. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते.

४. आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या रामा हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टिस करत असत.

५. रजनीकांत यांच्या घरात एक विशेष गेस्टरूम आहे. बालमित्र राज बहादूर यांच्यासाठी तो गेस्टरुम तयार करण्यात आल्याचं म्हटलं जातं. रजनीकांत बंगळुरूत बस कंडक्टर असल्यापासून या दोघांची मैत्री आहे.

६. ते एकमेव अभिनेते आहेत ज्यांचा सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला.

७. अनेकजण त्यांची पूजा करत असले तरी ते स्वत: मात्र कमल हसन यांचे मोठे चाहते आहेत.

८. प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयात जातात. त्यांच्या प्रत्येक भेटीत ऋषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्यांना दिली जाते.

९. १९७८ साली आलेल्या ‘भैरवी’ या सिनेमाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर नेलं. या सिनेमाच्या इतकी चर्चा झाली की दिग्दर्शक एम. भास्कर यांनी रजनीकांत यांचे ३५ फूटांचे पोस्टर चेन्नईमध्ये लावले होते.