विनोदवीर कृष्णा शर्मा आणि त्याचा कार्यक्रम ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ त्याच्या टीआरपीमुळे चर्चेत नसला तहीरी या कार्यक्रमामुळे होणारे वाद मात्र कृष्णाच्या या कार्यक्रमाला चर्चेत आणण्याचे चांगलेच काम करत आहेत. अनेक कलाकारांनी या क्रार्यक्रमात येण्यापासून नकार दिला असता ‘पार्श’ या बहुचर्चित चित्रपटाच्या टिमने या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. पण कार्यक्रमातील कलाकारांची विनोदाची शैली ‘पार्श’च्या टिमला काही रुचली नाही असेच दिसत आहे. या चित्रपटाती अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीने केलेल्या फेसबुक पोस्टवरुन तरी निदान असेच दिसत आहे.

‘मला ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या क्रार्यक्रमामध्ये ‘पार्श’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बोलवण्यात आले होते. मी, चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना यादव आणि माझी सहकलाकार राधिका आपटे या कार्यक्रमामध्ये गेलो होतो. ‘विनोद’ या कार्यक्रमाचा पाया असून हास्यविनोद करणं हा या शोचा उद्देश आहे असे मला सांगण्यात आले होते. सरतेशेवटी कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच तिथे एकमेकांची खिल्ली उडवण्याची सुरुवात झाली. पण नंतर माझ्या लक्षात आले की मलाच लक्ष केलं जात असून माझ्या त्वचेच्या रंगावरुनच वारंवार खिल्ली उडवली जात आहे’, असे तनिष्ठा म्हणाली. या कार्यक्रमामध्ये तनिष्ठाची तिच्या सावळ्या वर्णावरुन ‘काली कलूटी’, ‘तू जास्त ‘ब्लॅकबेरी’ खाल्ल्या असशील’, ‘मू काला है’ असे म्हणत खिल्ली उडवण्यात आली होती.

‘एका राष्ट्रीय वाहिनीवरील या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारच्या वर्णभेदाला प्राधान्य देणाऱ्या विषयांवर जो काही ‘बोचरा’ विनोद केला जात आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मला तिथे कोंडल्यासारखं वाटू लागलं होतं, मी काही वेळासाठी कसाबसा तिथे बसण्याचा प्रयत्न केला. पण काहीच बदललं नाही त्यामुळे मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला’, असे तनिष्ठाने सांगितले. दरम्यान तनिष्ठाने भारतात सावळ्या वर्णाविषयी असणारे समज-गैरसमजही सांगितले. तिच्यावर चुकीच्या पद्धतीने खिल्ली उडविण्यात आल्याची ही बाब त्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा त्यांच्याकडूनही तिला नीट उत्तर मिळाले नाही. सदर प्रसंगाबद्दल तनिष्ठाने संताप व्यक्त केला असून हा प्रकार तिला मुळीच रुचलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.