दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘गोलमाल : फन अनलिमिटेड’ हा २००६ साली प्रदर्शित झालेला चित्रपट प्रेक्षकांसाठी पैसा वसूल ठरला. या चित्रपटात अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि शर्मन जोशी यांच्या भूमिका होत्या. बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाची सीरिज रोहितने प्रेक्षकांच्या भेटीला आणली. पण नंतरच्या तीन चित्रपटांमध्ये शर्मन जोशी मात्र झळकला नाही. शर्मनच्या जागी अचानक श्रेयस तळपदेची वर्णी का लागली असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावेळी यावर बरीच चर्चासुद्धा झाली होती. पण आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे. जवळपास १० वर्षांनंतर स्वत: शर्मनने हे कारण सांगितलं आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शर्मन म्हणाला की, ‘निर्माते आणि व्यवस्थापक यांच्यासोबत आर्थिक बाबींवरून माझं बिनसलं. त्यात त्यांचे अहंकार आड आले. त्यामुळे पुढील चित्रपटांमधून त्यांनी मला वगळलं. हे सर्व होण्यापूर्वी मी निर्मात्यांना भेटून काम करण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. मात्र तोपर्यंत माझ्या भूमिकेसाठी त्यांनी दुसऱ्या अभिनेत्याची निवड केली होती. परंतु, त्याविषयी आता माझी कोणतीच तक्रार नाही.’

वाचा : मला मराठी चित्रपटांत काम करायचे आहे- शर्मन जोशी

चित्रपटातून वगळण्यामागे अजय देवगण आणि रोहित शेट्टीचा हात आहे का असाही प्रश्न यावेळी शर्मनला विचारण्यात आला होता. त्यावर नकार देत तो पुढे म्हणाला, ‘मी चित्रपटातून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा या दोघांच्या संपर्कात नव्हतो. मला वगळण्यामागे अजय किंवा रोहितचा हात असेल असं मला वाटत नाही. कारण माझी चर्चा केवळ निर्मात्यांशी सुरू होती.’

‘गोलमाल’ सीरिजचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरले. या सीरिजच्या फक्त पहिल्या चित्रपटात शर्मन झळकला होता.