|| स्वाती केतकर – पंडित

सिनेमा ही पाहण्यासोबतच ऐकण्याचीही गोष्ट असते, आणि म्हणूनच ध्वनीचा स्वतंत्र विचार गरजेचा आहे, सांगतायेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते ध्वनी संयोजक, ध्वनी अभियंते मंदार कमलापूरकर. ‘त्रिज्या’ या सिनेमासाठी त्यांना नुकताच ध्वनी संयोजनसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

ध्वनी संयोजक व्हावे असे का वाटले?

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सत्यजित के ळकर, अनमोल भावे या मित्रांमुळे चित्रपटाच्या ध्वनी विभागाविषयी एक कुतूहल निर्माण झाले. त्याविषयी आणखी माहिती घेत गेलो तेव्हा आणखी रस निर्माण झाला आणि यातच आपले करिअर घडवायचे हा निर्धार झाला. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून मी ध्वनी अभियांत्रिकीचे शिक्षणही घेतले.  सुरुवातीला अनमोल भावे, रसूल पुकु ट्टी, सुभाष साहू, निहार सामल, प्रमोद थॉमस, विनोद सुब्रमण्यन यांच्यासारख्या ध्वनी क्षेत्रातील तज्ज्ञांकडे साहाय्यक म्हणून काम के ले. अनुभव घेतला आणि स्वतंत्र वाटचाल सुरू केली.

 तुम्हाला ‘त्रिज्या’साठी२०२१मध्ये राष्ट्रीय पुरस्कार तर २०१९मध्ये ‘पुष्पक विमान’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा राज्य पुरस्कार मिळाला होता. दोन्हीचा अनुभव कसा होता? या प्रकल्पांसाठी पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती का?

खरे सांगायचे तर काम करताना पुरस्काराचा विचारही डोक्यात नव्हता! आपले काम मात्र चांगले होते आहे, याची पोचपावती नक्कीच मिळाली होती. कारण दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक त्यातील ध्वनीच्या कामगिरीवर समाधानी होते. चित्रपट हे दृक्-श्राव्य माध्यम आहे. आणि श्राव्य म्हणजे केवळ संवाद आणि गाणी नव्हेत तर ध्वनीचे इतरही महत्त्वाचे घटक आहेत. खरे तर संपूर्ण चित्रपटाचा प्रभाव पोहोचवणारे ध्वनी हे एक प्रभावी माध्यम असते. हे काम करताना नक्कीच वेगळा विचार के ला होता त्याचे चीज झाल्याची भावना पुरस्काराने दिली. राष्ट्रीय पुरस्कार हा देशपातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार असल्याने त्याचा आनंद मोठा आहेच.

 ‘त्रिज्या’ काहीसा गंभीर धाटणीचा सिनेमा, तर त्याउलट ‘पुष्पक विमान’. भरपूर गाणी, संवाद आणि विनोदाची पखरण असलेला सिनेमा. मग दोन्हीसाठी काम करताना ध्वनीचे काय वेगळेपण जाणवले?

‘त्रिज्या’ ही एक इंडिपेंडंट फिल्म आहे. स्वत:च्या शोधात निघालेल्या एका माणसाच्या शोधाची त्रिज्या कशी विस्तारत जाते, हे सांगणारा हा एक वेगळा सिनेमा आहे.  त्रिज्यामध्ये घटना, संवाद कमी आहेत. पाश्र्वसंगीत तर नाही. त्याऐवजी आम्ही अ‍ॅम्बियन्ट म्युझिक वापरले आहे. म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात आजूबाजूला आपल्या कानावर पडणारे संगीत. यात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सिनेसंगीताचे तुकडे आहेत, जॅझ आहे. आपण जगात वावरताना ऐकू  येणारे आवाज… साधे रेल्वेचे आवाजही आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रोसेस करून वापरले आहेत. दिग्दर्शक अक्षय इंडिकरच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या, वेगळ्या प्रकारचे काम झाले. ‘हॉलीवूड रिपोर्टर’सारख्या प्रतिष्ठित मासिकात त्याचे परीक्षण छापून आले आणि तिथेही सिनेमाच्या ध्वनीचा आवर्जून उलेख झाला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर त्यावर शिक्कामोर्तबच झाले.

‘पुष्पक विमान’मध्ये गाणी आहेत. विनोदी सिनेमा असल्याने संवादांचा ठसका असणार होताच. तो न झाकोळताही ध्वनी संयोजन करून त्याचा प्रभाव वाढवायचा होता. पण दिग्दर्शक वैभव चिंचाळकरसह खूप छान ट्युनिंग असल्याने साध्या साध्या बाबतीतही वेगळा ध्वनीपरिणाम साधता आला. सिनेमाच्या नावातच विमान आहे. आकाशातून जाणाऱ्या विमानाचे आवाज त्यात येणार होते. ते करताना तो सीन जिथे चित्रित झाला आहे, अशा ठिकाणी जाऊन आम्ही नवे आवाज रेकॉर्ड के ले. स्टॉक साऊंड वापरायचे टाळले. कोणते पात्र नेमके  कोणत्या वेळी, कोणत्या दिशेने तो आवाज ऐकते आहे… याचा नेमका कानोसा घेऊन तो आवाज सिनेमात जोडता आला. त्यामुळे त्यातला खरेपणा अधिक स्पर्शून गेला. गावातल्या मंदिरातल्या भजनाला आम्ही लोकलमध्ये होणाऱ्या भजनाचा आवाज जोडला. गावातला निवांतपणा आणि मुंबईची धावपळ या जोडणीतून छान मांडता आली. सिनेमातील एका प्रसंगात लाइट जातात. पडद्यावर अंधार होतोच, पण त्याचवेळी त्या सीनच्या बाहेर खेळणाऱ्या मुलांच्या वैतागाच्या सुस्काऱ्यांमधून तो ‘दृक्श्राव्य परिणाम’ थेट पोहोचवता आला. दिग्दर्शकाचे पूर्ण सहकार्य असल्याने असे लहान प्रसंगही ध्वनीच्या माध्यमातूनही छान फु लवता आले.

मनोरंजनाच्या नव्या साधनांसह सिनेमाच्या तांत्रिक बाजूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे का?

नक्कीच बदलतो आहे. जगभरचे सिनेमे-सीरिज घरबसल्या बघायला मिळाल्याने चित्रपटकर्ते आणि प्रेक्षक दोघांचाही आवाका वाढतोय. अनेक उत्तम दिग्दर्शक ध्वनी संयोजनाकडे विशेष लक्ष देताना दिसतायेत. वेळ देतायेत. त्यामुळे काम करायलाही मजा येते आहे. दिग्दर्शक अमित दत्ता यांच्यासोबत मी ‘सेव्हंथ वॉक’ नावाची फिल्म के ली. या ७० मिनिटांच्या सिनेमात एकही संवाद नाही. के वळ आवाज आहेत. या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. ‘नदी वाहते’ हा दिग्दर्शक संदीप सावंत यांचा असाच वेगळा सिनेमा. त्यात नदीच्या भावना, तिचे मूड्स, त्यातील पात्रांचे नदीशी बोलणे अशा अनेक निराळ्या संकल्पना होत्या. त्यात प्रत्यक्ष लोके शनवर रेकॉर्ड के लेले अस्सल आवाजाच वापरले. सिनेमाचा एक समुच्चित प्रभाव पडण्यात त्याचा नक्कीच वाटा आहे.

ओटीटीच्या येण्याने जगभरातल्या सिनेमाचे दालन खुले झाले आहे. चित्रपट, वेबमालिका, लघुपट, माहितीपट असे अनेक प्रकल्प वाढल्याने संधी भरपूर आहेत, पण स्पर्धाही तितकीच आहे. त्यात टिकू न राहण्यासाठी प्रत्येक तंत्रज्ञ आपले काम अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करतो आहे. याचा फायदा भारतीय सिनेसृष्टीला नक्कीच होणार आहे.