सलमान खान आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यामध्ये गेले कित्येक वर्षे खास संवाद नव्हता. त्यांच्यात भांडण असे काही नव्हते, मात्र शाहरूखशी असलेली करणची घट्ट मैत्री हे सलमान आणि त्याच्यातल्या दुराव्याचे मोठे कारण होते. पहिल्यांदा आदित्य चोप्राने शाहरूखला सोडचिठ्ठी देऊन सलमानला यशराजच्या चित्रपटाचा नायक बनवल्यानंतर करण जोहरनेही तोच कित्ता गिरवला. करण जोहर आणि सलमान खान पहिल्यांदाच ‘शुद्धी’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. मात्र, ‘एआयबी’ शोच्या कृपेने इथेही त्यांच्या नात्यात माशी शिंक लीच..
‘एआयबी’सारख्या शोच्या माध्यमातून जाहीरपणे असभ्य बोलणे, असभ्य वर्तन करणे या गोष्टी सलमानच्या तत्त्वात बसणाऱ्या नाहीत. चित्रपटांच्या बाबतीतही सलमान या गोष्टींबद्दल काटेकोर असतो. त्यात या शोमध्ये सलमानची बहीण अर्पिता हिच्यावर केलेले विनोदही ‘भाई’च्या जिव्हारी बोचले आणि त्याने करण जोहरला खडे बोल सुनावले. अर्पिताच्या बाबतीत सलमान नेहमीच हळवा राहिला आहे. आजवर तिचे सगळे कोडकौतुक पुरवणाऱ्या सलमानसाठी त्याच्या लाडक्या बहिणीवर जाहीरपणे झालेली शेरेबाजी हा मोठा धक्का होता. त्याने यावरून करणला चांगलेच धारेवर धरले. एवढेच नाही तर करणचे वागणे आपल्याला पटलेले नसून आपण ‘शुद्धी’ चित्रपट सोडून देऊ, अशी धमकीही त्याने दिली आहे.
सलमानच्या या धमकीने करणचे डोके नक्कीच ताळ्यावर आले असेल. मुळात, भरमसाट पैसे मोजून करण जोहरने ‘इमॉर्टल्स ऑफ मेलूहा’सह इतर दोन्ही कादंबऱ्यांचे हक्क विकत घेतले. त्यानंतर त्याने हृतिक रोशनला मुख्य भूमिकेत घेऊन ‘शुद्धी’ चित्रपटाची जाहीर घोषणाही केली. पण, घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट संकटात सापडला आहे. पहिल्यांदा चित्रपटाची नायिका करिना कपूर या चित्रपटातून बाहेर पडली. त्यानंतर हृतिकनेही चित्रपट सोडला. तेव्हापासून या चित्रपटासाठी नायक मिळणे ही करणसाठी अवघड मोहीम होऊन बसली होती. त्याने यासंदर्भात आमिरची गाठभेट घेतली. त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. मात्र, सलमानने या चित्रपटाला लगोलग होकार दिल्यानंतर कुठे गाडी रुळावर आली होती. मात्र, चित्रपटाची सुरुवात होण्याआधीच या शोमुळे दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.