भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची तिसरी पिढी आजोबांचा वारसा जपण्यासाठी सरसावली आहे. पंडितजींचा नातू विराज श्रीनिवास जोशी यानेही आपले वडील आणि आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत आपला गळा गाता ठेवला आहे.
मुंबईत दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात विराजने शास्त्रीय गायन सादर केले. तेथे त्याने ‘यमन’ रागातील दोन बंदिशी सादर केल्याच; पण पंडितजींनी अजरामर केलेल्या ‘अभंगवाणी’तील नामाचा गजर, माझे माहेर पंढरी हे अभंग तसेच रामाचे एक भजन आणि ‘बाजे मुरलिया’ सादर करून उपस्थितांचे मन जिंकून घेतले.
विराज सध्या पुण्यातील सेवासदन शाळेत सहावीत शिकत आहे. संगीताचे प्राथमिक धडे त्याने वडिलांकडेच गिरवले. विराजला गाणे आणि सूर याचा नाद लहानपणीच लागला.
आजोबांच्या कार्यक्रमाला तो जात असे. सुधीर नायक हे पंडितजींबरोबर हार्मोनियमवर असत. एकदा तो काही तरी गुणगुणत असताना नायक यांनी त्याला सूर लावून दाखवण्यास सांगितले आणि तीन वर्षांच्या विराजने बरोबर सूर लावून दाखविला. एकदा सवाई गंधर्व महोत्सवात श्रीनिवास जोशी यांचे गाणे होते. विराज त्यांच्या मागे बसला होता. त्या वेळी विराजने सूर लावला होता.
विराज चौथीत असताना त्याला सवाई गंधर्व महोत्सवात चार अभंग सादर करण्याची संधी मिळाली आणि विराजनेही दमदारपणे हे अभंग सादर केले.
विराजची आई शिल्पा आणि वडील श्रीनिवास यांनी मग विराजला गाण्यासाठी प्रोत्साहित केले. सुधाकर चव्हाण हे सध्या विराजला शास्त्रीय संगीताचे धडे देत आहेत.