17 July 2019

News Flash

या बॉलिवूड अभिनेत्याला रोहित शेट्टी मानतो ‘लकी चार्म’

वडीलांच्या निधनानंतर रोहितने शिक्षण अर्ध्यावर सोडलं आणि करिअरकडे वळला

रोहित शेट्टी

अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा या सर्व गोष्टी एकाच चित्रपटात म्हटलं की डोळ्यासमोर येतो चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी. रोहितच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीस गाजवलं असून नुकताच प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’ हा चित्रपटही तिकीटबारीवर तुफान गाजला. या चित्रपटांच्या यशानंतर रोहित त्याच्या आगामी चित्रपटांकडे वळला आहे. बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारा रोहित बॉलिवूडमधील एका कलाकाराला त्याचा लकी चार्म मानत असल्याचं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार लकी चार्मवर विश्वास ठेवतात. यामध्ये सलमान खान, अमिताभ बच्चन हे कलाकारही विशिष्ट गोष्टींना त्यांचा लकी चार्म मानत असल्याचं पाहायला मिळालं आहे. यातच आता रोहितने त्याच्या लकी चार्मविषयी सांगितलं. रोहित अभिनेता अजय देवगणला त्याचा लकी चार्म मानत असल्याचं नुकतंच त्याने सांगितलं आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायक आणि फेमस स्टंटमॅन एम.बी शेट्टी हे रोहितचे वडील. वडीलांच्या निधनानंतर घराची आणि आई-बहिणींची जबाबदारी रोहितवर आली.त्यामुळे रोहितने शिक्षण अर्ध्यावर सोडलं आणि करिअरकडे वळला. रोहितला ३५ रुपये पहिली कमाई मिळाली होती. त्यानंतर त्याने अनेक लहान मोठी काम केली. वेळप्रसंगी अभिनेत्री तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्याचंही काम केलं. मात्र या साऱ्या कामानंतर रोहित दिग्दर्शकीय क्षेत्राकडे वळला. ‘फुल और कांटे’ या चित्रपटाचं त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर तो खऱ्या अर्थाने दिग्दर्शनाकडे वळला. या क्षेत्रात आल्यानंतर त्याने केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये नायक म्हणून अजय देवगणची निवड केली. विशेष म्हणजे त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. त्यामुळे रोहित अजयला त्याचा ‘लकी चार्म’ मानतो.

दरम्यान, आतापर्यंत गोलमाल या चित्रपटाचे चार पार्ट प्रदर्शित झाले असून प्रत्येक पार्टने तिकीटबारीवर बक्कळ कमाई केली आहे. रोहितने अजयसोबत ‘फूल और कांटे’, ‘गोलमाल’, संडे, ‘गोलमाल रिटर्न’, ‘ऑल द बेस्ट’, ‘गोलमाल 3’, ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न’, ‘बोल बच्चन’, ‘गोलमाल अगेन’ असे अनेक चित्रपट केले आहेत.

 

First Published on March 15, 2019 2:56 pm

Web Title: this bollywood actor rohit shettys lucky charm