ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांच्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. १९ मे रोजी ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या विवाहसोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार याची उत्सुकता अनेकांनाच आहे. मेगनची बॉलिवूडमधली मैत्रीण म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार का, अशाही चर्चांना कलाविश्वात उधाण आलं होतं. तर बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाला उपस्थित राहणार यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या वृत्ताला दुजोरा दिला असून परदेशातील प्रसारमाध्यमांनीही यासंदर्भात माहिती दिली. आपली जिवलग मैत्रीण मेगनच्या आयुष्यातील या खास दिवशी तिच्यासोबत राहण्यासाठी प्रियांका अत्यंत आनंदी असल्याची माहिती एका वेबसाइटने दिली आहे. या शाही विवाहसोहळ्यात प्रियांका काय परिधान करणार, याकडेही अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : अरमान मलिकचा ‘घर से निकलते ही..’ अल्बम वादाच्या भोवऱ्यात

मुख्य म्हणजे प्रियांका मेगन आणि प्रिन्स हॅरीच्या शाही विवाहसोहळ्यात मेगनची ‘ब्राइड्समेड’ असणार का अशाही चर्चांना प्रचंड उधाण आलं होतं. मात्र, याबाबत तिनं सध्या मौन बाळगणंच पसंत केलं. प्रियांका मेगनच्या ब्रायडल पार्टीलाही हजेरी लावू शकते असे म्हटले जातेय. पण, याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रियांका आणि मेगन या खूप चांगल्या मैत्रिणी असून, त्यांच्या मैत्रीचे किस्से सोशल मीडियावरही पाहायला मिळाले आहेत. दरम्यान ब्राइड्समेड होण्याची संधी तिला मिळणार की नाही, ही पुढची गोष्ट. पण, सध्यातरी प्रियांका तिच्या खास मैत्रिणीच्या म्हणजेच मेगन आणि प्रिन्स हॅरीच्या लग्नासाठी उत्सुक आहे हेच खरे.