‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ये है मोहब्बतें’मधील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिच्या पतीसोबत बुडापेस्ट येथे आऊटडोअर शूटिंगसाठी गेली होती. तेथून जेव्हा हे दोघे परतले, तेव्हा तिचा पती म्हणजेच अभिनेता विवेक दहियाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा खुलासा केला. बुडापेस्ट विमानतळावर त्याला वर्णभेदाचा सामना करावा लागल्याचे त्याने सांगितले.

या घटनेविषयी त्याने सांगितले की, ‘मी १८ वर्षांचा असल्यापासून देशभरात आणि देशाबाहेर प्रवास करतोय आणि शिक्षणासाठी युकेमध्ये सात वर्षे राहिलो. गेल्या १४ वर्षांत माझ्यासोबत अशी घटना कधीच घडली नव्हती. बुडापेस्ट हे पहिले असे शहर आहे जिथे मला वर्णभेदाचा सामना करावा लागला. सुरुवातीला मी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. पण नंतर मला वर्णभेद जाणवला. विमानतळावर वर्णभेदावरून लोकांना प्राधान्य देण्याच्या घटनेमुळे माझा राग अनावर झाला.’

या घटनेनंतर प्रत्येक शहरातील पर्यटकांना तेथील नागरिकांनी सन्मानाने आणि कोणताही भेदभाव न करता चांगली वागणूक द्यावी. सर्वांना समान वागणूक मिळालीच पाहिजे, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.