लहान मोठ्या भक्तांचा लाडका गणपती बाप्पा लवकरच त्याच्या घरी यायला सज्ज झाला आहे. यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असला तरीही या सणाची रंगत आणखी वाढणार आहे ‘वक्रतुंड महाकाय’ या सिनेमामुळे. २५ सप्टेबर रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा मनोरंजक आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाण करवून देणारा आहे. सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारा अल्ताफ (नमन जैन) आणि त्याचा मित्र झालेला गणपतीचा बाहुला याची रंजक गोष्ट सिनेमातून मांडली आहे. सिनेमाची कथा हा गणपतीचा बाहुला आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या व्यक्तीरेखांबद्दल आहे. त्यामुळे असा हा गणपती प्रत्येकाला त्याच्या भरकटलेल्या वाटेवरून योग्य ठिकाणी कशाप्रकारे नेऊन ठेवतो याची कहाणी  सिनेमात अतिशय उत्कृष्टरित्या गुंफली आहे.  सिनेमात राष्ट्रीय पारितोषिक विजेता लेखक विजय मोरया याची देखील प्रमुख भूमिका आहे. घातपाती कारवाया घडवून आणण्याच्या उद्देशाने आलेल्या आतंकवाद्याची भूमिका त्याने वठवली आहे. या सिनेमाचं विशेष म्हणजे निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा मराठी चित्रपट निर्मितीचा पहिलाच प्रयत्न आहे. इ- सेन्स मोशन पिक्चर्स, बोहरा ब्रोज, अलुम्ब्रा एंटरटेनमेंट्स, सिख्या एंटरटेनमेंट्स, सबॅकॉम यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात उषा नाडकर्णी, नमन जैन, प्रार्थना बेहेरे, नचिकेत पूर्णपात्रे, राहुल पेठे, विनायक भावे,जयंत सावरकर, शशांक शेंडे, ऋषी देशपांडे यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन पुनर्वसु नाईक तर लेखन योगेश विनायक जोशी यांनी केले आहे. छाया दिग्दर्शन मितेश मिरचंदानी, संकलक आशिष म्हात्रे -अपूर्वा मोतीवाले, संगीत संकेत नाईक- संकर्षण किणी, वेशभूषाकार सचिन लोवलेकर – दीप्ती म्हात्रे यांनी केलं आहे. हिंदी आणि मराठी भाषेतील हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.