हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात डोकावून पाहिलं असता अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात ज्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच या विस्तीर्ण कलाविश्वाचाच एक भाग म्हणजे आर.के. स्टुडिओ. अभिनेता राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली. ही वास्तू म्हणजे जणू आठवणींची साठवण करणारं एक ऐतिहासिक ठिकाणंच. या वास्तूइतकीच त्याच्या लोगोच्या जन्माची कथा रंजक आहे. राज कपूर यांनी आर. के. स्टुडिओसाठी लोगो कशाप्रकारे निवडला ते जाणून घेऊयात..

रशियन कादंबरीकार आणि विचारवंत लिओ टॉलस्टॉय यांनी एक लघुकादंबरी लिहिली होती. या कादंबरीत एका व्हायोलिनवादकाची हृदयस्पर्शी प्रेमकहाणी होती. एक व्हायोलिनवादक एका महिलेवर जीवापाड प्रेम करतो. पण हे प्रेम एकतर्फी राहिल्याने क्रोधाग्नीत असलेला व्हायोलियवादक त्या महिलेची हत्या करतो. टॉलस्टॉयच्या या लघुकादंबरीला रशियात बंदी घालण्यात आली होती. पण जगभरात ही कादंबरी वाचली गेली.

पेंटिंग, ‘रुत्जर सोनाटा’

वाचा : राज्य शासनानेच आर. के. स्टुडिओ विकत घेऊन संग्रहालय उभारावे- माणिकराव ठाकरे 

१९व्या शतकात फ्रान्सच्या एका कलाकाराने ही कादंबरी वाचली आणि त्याने त्या कादंबरीतील व्हायोलिनवादक आणि त्या महिलेचे चित्र रेखाटले. टॉलस्टॉसने लिहिलेली लघुकादंबरी आणि फ्रान्सच्या त्या चित्रकाराने काढलेल्या चित्राचे नाव होते, रुत्जर सोनाटा.
राज कपूर यांनी हे चित्र पाहिलं आणि १९४९ साली प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्यांनी तसाच काहीसा प्रयोग केला. हा चित्रपट आणि त्याचे पोस्टरसुद्धा तुफान गाजलं होतं. राज कपूर यांच्या एका हातात व्हायोलिन आणि दुसऱ्या हातावर नर्गिस असं हे पोस्टर पुढे आर. के. स्टुडिओचा लोगो बनलं.

‘बरसात’ चित्रपटाचे पोस्टर
r k studio logo
आर. के. स्टुडिओचा लोगो

राज कपूर आणि नर्गिस यांनी १५ हून अधिक चित्रपटांत एकत्र काम केलं होतं. या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आणि कदाचित म्हणूनच आर. के. स्टुडिओच्या लोगोमध्ये नर्गिस यांनी जागा मिळवली.