X

‘तारक मेहता..’मध्ये परतण्यास दयाबेनने मागितले इतके मानधन

प्रसूती रजेनंतर ती येत्या काही दिवसांत मालिकेत परतणार आहे. मात्र त्यासाठी दिशाने मालिकेच्या निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्या आहेत.

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी लवकरच मालिकेत परतणार आहे. प्रसूती रजेनंतर ती येत्या काही दिवसांत मालिकेत परतणार आहे. मात्र त्यासाठी दिशाने मालिकेच्या निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्या आहेत.

‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार दिशाने ठेवलेल्या अटी निर्मात्यांनी मान्य केल्या तरच ती परतणार असल्याचं कळतंय. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. आधी दिशा एका एपिसोडसाठी १.२५ लाख रुपये मानधन घ्यायची. आता तिने त्यात २५ हजारांची वाढ करत १.५० लाख रुपये मानधन मागितले आहे. मानधनासोबतच दिशाने काम करण्याच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेतच शूटिंग करणार असल्याची अट तिने ठेवली आहे. म्हणजेच उशिरापर्यंत काम न करता संध्याकाळी सहा वाजता तिचं शूटिंग संपलं पाहिजे. मालिकेतील तिच्या भूमिकेची लोकप्रियता पाहता दुसऱ्या अभिनेत्रीला घेणं निर्मात्यांना रुचत नाही आहे. त्यामुळे दिशाची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी तिच्या सर्व अटी मान्य केल्याचं समजतंय.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती काही महिने रजेवर होती. गेल्या काही दिवसांपासून दिशा तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या जोर धरत होत्या. तिची मुलगी फार लहान असून सध्या तिला मुलीसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, म्हणून ती मालिकेला कायमचे अलविदा करणार असल्याचे म्हटले जात होते. मालिकेचे निर्माते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते अशीही चर्चा होती. पण आता या चर्चा खोट्या ठरल्या असून दयाबेन लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे.