21 February 2019

News Flash

असा साकारला चित्तथरारक ‘तुंबाड’

हा थरारपट साकारण्यासाठी सहा वर्षांहून अधिक काळ लागला. सलग चार वर्ष पावसाळ्यात सोहम शाहने ही शूटिंग केली.

'तुंबाड'

रहस्य आणि थरार या दोघांची सांगड घालत दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी ‘तुंबाड’ हा चित्रपट साकारला. तो साकारण्यासाठी थोडाथोडका नाही तर जवळपास सहा वर्षांहून अधिक काळ लागला. खरंतर तुंबाड हा शब्द ऐकला की आपल्याला ‘तुंबाडचे खोत’ ही कादंबरी आठवते. त्यावरच हा चित्रपट बेतला आहे की काय असं अनेकांना वाटलं असेल. पण त्याच्याशी चित्रपटाच्या कथेचा काहीच संबंध नाही. सहा वर्षांहून अधिक काळ कठोर मेहनत करत सोहम शाह, ज्योती मालशे, अनिता दाते या कलाकारांसह ‘तुंबाड’ हा चित्तथरारक चित्रपट साकारण्यात आला.

काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलतात पण हा चित्रपट साकारण्यासाठी त्यातील कलाकारांना तोच लूक, तीच देहयष्टी कायम ठेवावी लागली. ‘तुंबाडसाठी सहा वर्ष तोच लूक कायम ठेवणं खूप अवघड होतं. किंबहुना लूकपेक्षा भूमिकेची मानसिकता तशीच पकडून ठेवणे जास्त कठीण होतं. राही बर्वेंनी जेव्हा मला कथा सांगितली तेव्हाच मला ती खूप आवडली. अशी भूमिका भविष्यात मिळणार नाही म्हणून तातडीने मी त्यांना होकार कळवला,’ असं अभिनेता सोहम शाह सांगतो.

चित्रपटातील बराचसा काळ पावसाळ्यातील दाखवला असल्याने सलग चार वर्ष पावसाळ्यात ही शूटिंग पार पडली. ‘सतत पावसात शूटिंग करणं, अंगावर माती लावणं आणि पुन्हा शूटिंग करणं काही सोपं नव्हतं. या संपूर्ण प्रक्रियेत प्रचंड थकवा जाणवतो. पण मनासारखी कथा पडद्यावर उभी करण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करण्याची टीमची तयारी होती. म्हणूनच चित्रपटाला लागेल तितका वेळ द्यायला आम्ही तयार होतो,’ असं तो म्हणाला.

‘तुंबाड’ हा चित्रपट अंगावर काटा आणणारा ठरतो तो त्यातल्या ग्राफीक्समुळे. व्हीएफएक्सचा उत्तर वापर यामध्ये करण्यात आला आहे. आजकाल इंग्रजीसह इतर भाषांमध्ये आपण चोख ग्राफीक्स पाहतो. मग यामध्ये तुंबाडसुद्धा बाजी मारणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याविषयी सोहम सांगतो, ‘थरारपट साकारण्यासाठी उत्तम व्हीएफएक्ससोबतच दमदार कथासुद्धा लागते. बॉलिवूडमध्ये थरारपटात तशा कथा पाहायला मिळाल्या नाहीत. पण तुंबाड याला अपवाद ठरेल अशी आशा आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांच्यासाठी हा एक भन्नाट अनुभव राहिला आहे.’

वाचा : नागराजच्या ‘नाळ’चा टीझर आहे या हॉलिवूडपटातील दृश्याची कॉपी?

१९१८ पासून १९५० असा काळ या चित्रपटात उभा करण्यात आला आहे. वेशभूषा, कलादिग्दर्शन, अभिनय आणि वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान अशा सर्वच बाबतीत हा चित्रपट उत्तम ठरल्याचं मत समीक्षकांनी नोंदवलं आहे. तेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमाईचे रेकॉर्ड मोडणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on October 12, 2018 1:33 pm

Web Title: this is how mystery thriller tumbbad movie created sohum shah interview