वेब विश्वातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुसरा सिझन प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होऊ लागली. यंदा काही नवीन कलाकारांचीही सीरिजमध्ये भर पडली. रणवीर शौरी, कल्की कोचलीन आणि पंकज त्रिपाठी नव्याने या सिझनमध्ये पाहायला मिळाले. पंकज त्रिपाठींनी गणेश गायतोंडेच्या तिसऱ्या गुरुजींची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांची निवड कशी झाली याचा एक मजेशीर व्हिडीओ नेटफ्लिक्सने पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत पंकज ऑडिशनसाठी आले असता त्यांना सर्वांत आधी गणेश गायतोंडेचा संवाद दिला जातो. हातात बंदूक घेत गायतोंडेचा संवाद बोलताना ते दिसतात. ते व्यवस्थित न जमल्याने त्यांना बंटीचा डायलॉग दिला जातो. बंटीचे संवाद बोलताना त्यात अश्लीलता आढळल्याने पंकज त्या भूमिकेस नकार देतात. अखेर चिडून तिथून निघून जाण्याची तयारी करत असतानाच त्यांना गुरूजींच्या भूमिकेसाठी संवाद दिले जातात. हे संवाद बोलताना पंकज पूर्णपणे गुरूजींच्या भूमिकेत मग्न झाल्याचे दिसतात आणि त्यांच्यासोबत ऑडिशन घेणारेही एकटक बघतच बसतात. त्यातील एक जण फोन करून सांगतो की’ ”निर्मात्यांना सांग गुरूजी भेटले आहेत.”

आणखी वाचा : ‘स्वत:वर The Gay नावाचा चित्रपट बनव’, म्हणणाऱ्याला करणचं सडेतोड उत्तर 

नेटफ्लिक्सने पोस्ट केलेल्या या व्हिडीओ लाखोंनी व्ह्यूज मिळाले आहेत. अनुराग कश्यप व नीरज घायवान दिग्दर्शित या सीरिजमध्ये सैफ अली खान व नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजला केवळ देशातच नाही, तर विदेशातही चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनसाठी तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत. या सीरिजचा भारतात सर्वाधिक चाहता वर्ग आहे.