गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूड कलाकारांमध्ये दुर्धर आजारांची मालिका वाढत आहे. याआधी अभिनेता इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्युमर हा दुर्धर आजार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त असल्याच्या बातमीने कलाविश्वात खळबळ माजली आहे. काही आजार असे असतात ज्यांचे निदान पहिल्या स्टेजला होतेच असे नाही. कॅन्सर हा असाच आजार आहे. ज्याची प्राथमिक लक्षणे तितकीशी आढळत नाहीत. मात्र जेव्हा आढळतात तेव्हा त्या आजाराने दुसरी अथवा तिसरी स्टेज गाठलेली असते.

हाय-ग्रेड कॅन्सर झाल्याची माहिती सोनालीने ट्विटरच्या माध्यमातून दिली. भावनिक पोस्टमध्ये सोनालीने लिहिलं की, ‘अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात बदल होतो. दुखण्यांमुळे काही चाचण्या केल्या आणि त्यातून हाय- ग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं.’ अनेकदा कॅन्सरची लक्षणं दिसत नसल्याने त्याचे निदान लवकर होऊ शकत नाही. हाय ग्रेड कॅन्सर अधिक वेगाने पसरतो आणि त्याची उपचारपद्धतीही वेगळी असते. लो ग्रेड कॅन्सरमध्ये कॅन्सरच्या पेशी या सामान्य पेशींप्रमाणेच दिसतात. तसेच यांचे शरीरात वाढण्याचे प्रमाणही हळूहळू असते.

काही दिवसांपूर्वी अभिनेता इरफान खानच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. काही दुखण्यांमुळे डॉक्टरकडे गेले असता, चाचण्यांमध्ये दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले. ट्विटरद्वारे इरफानने यासंदर्भात माहिती दिली होती आणि त्यानंतर तो लंडनला उपचारासाठी रवाना झाला.

आजाराची लक्षणं लवकर दिसली आणि लवकर त्याचे निदान झाले तर उपचार करणं सोपं जातं. पुढच्या स्टेजपर्यंत आजार जाण्याचा धोका कमी असतो. अनेकदा इतर काही दुखण्यांमुळे डॉक्टरकडे गेल्यानंतर अशा प्रकारच्या आजाराचं निदान होतं आणि तोपर्यंत दुसरी अथवा तिसरी स्टेज आजाराने गाठलेली असते.