अभिनेते बोमन इराणी यांनी बॉलिवूडमध्ये कारकिर्द उशिरा सुरू केली पण दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटामुळे ते सर्वाधिक चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. या चित्रपटातील डॉ. अस्थानाची भूमिका आजही प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. ही भूमिका कशी मिळाली, याविषयी त्यांनी ‘यारों की बारात’ या कार्यक्रमात सांगितलं होतं.

“विधू विनोद चोप्रा यांनी माझा एक इंग्रजी भाषेतील चित्रपट पाहिला होता आणि कोणाला तरी माझ्याबद्दल विचारून त्यांनी मला भेटण्यास बोलावलं. त्यावेळी त्यांनी थेट माझ्या हातात दोन लाख रुपयांचा चेक ठेवला. मी त्यांना कोणता चित्रपट आहे विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, सध्या कोणताच नाही, पण ही तुझी साइनिंग रक्कम आहे. तुम्ही माझ्या आगामी चित्रपटात काम कराल. त्याच्या आठ महिन्यांनंतर मला त्यांचा फोन आला की कथा सापडली आणि तो चित्रपट होता मुन्नाभाई एमबीबीएस”, असं बोमन यांनी सांगितलं.

आणखी वाचा : सिद्धार्थ चांदेकरच्या घरी अभिज्ञा भावेचं केळवण

मुन्नाभाई एमबीबीएसच्या यशानंतर २००६ मध्ये लगे रहो मुन्नाभाईमध्ये ते पुन्हा झळकले. त्यानंतर ‘३ इडियट्स’मधल्या प्रोफेसरच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा त्यांची जोरदार चर्चा झाली.