26 September 2020

News Flash

..या व्यक्तींच्या हातात असणार सेन्सॉरची कात्री

रमेश पतंगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत.

सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन

भारतीय चित्रपटसृष्टीने जणू शुक्रवारी सुटकेचा श्वास सोडला असावा. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची शुक्रवारी अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. गीतकार, पटकथा लेखक आणि अॅड गुरु प्रसून जोशी हे आता ‘सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’च्या (CBFC) अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. आता प्रसून जोशींसह पुढील व्यक्तींकडे यापुढे सेन्सॉरची कात्री असणार आहे.

विद्या बालन-
‘कहानी’, ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी हरहुन्नरी अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती विद्या बालन हिची सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. ‘हम पाँच’ या मालिकेने करिअरची सुरुवात करणाऱ्या विद्याने ‘परिणीता’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि सर्वांची मनं जिंकली. अभिनयाबरोबरच विद्या सामाजिक विषयांबद्दलही जागरुक आहे. त्याविषयी ती नेहमीच आपले मत मांडते. सेन्सॉर बोर्डाची सदस्य झालेली विद्या म्हणाली की, सीबीएफसीची सदस्य झाल्याचा मला आनंद आहे. सदस्य म्हणून माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या मी यशस्वीपणे पार पाडू शकेन अशी अपेक्षा करते. मी या नव्या वाटचालीसाठी उत्साही असून, यात आपल्या चित्रपटांमध्ये आजच्या काळात जगत असलेल्या समाजाची संवेदनशीलता, वास्तविकता आणि गुंतागुंत दाखवण्याची परवानगी दिली जाईल.

तालाकाडू श्रीनिवासय्या नागभर्ना-
राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माता तालाकाडू श्रीनिवासय्या नागभर्ना यांचाही प्रसून जोशींच्या सदस्य मंडळात समावेश झाला आहे. नऊ राष्ट्रीय पुरस्कार आणि १४ राज्य पुरस्कार या दिग्दर्शकाच्या नावावर आहेत. भारतीय चित्रपट केवळ बॉलिवूडच्या कार्याद्वारे परिभाषित केला जाऊ नये. बॉलिवूडपेक्षा प्रादेशिक चित्रपट अधिक कलात्मक आणि माहितीपूर्ण असल्याचे त्यांनी एकदा म्हटलेले.

रमेश पतंगे-
रमेश पतंगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असून, ते २०१५ साली सेन्सॉर बोर्डावर आले. मराठी साप्ताहिकाचे ते संपादकदेखील आहेत.

वाणी त्रिपाठी टिकू-
अभिनेत्री, राजकीय नेत्या असलेल्या वाणी त्रिपाठी टिकू यांनी ‘चलते चलते’ आणि ‘दुश्मन’ या चित्रपटांमध्ये काम केले असून, त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिवदेखील राहिल्या आहेत. ‘सेन्सॉरशीप’ ही संज्ञा वगळण्यात यावी आणि केवळ चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यापुरते मर्यादित राहावे असा आग्रह करणाऱ्यांपैकी त्या एक आहेत. चित्रपटकर्त्यांच्या सर्जनशील स्वातंत्र्य हक्कामध्ये ढवळाढवळ करणे चुकीचे असल्याचे त्यांचे मत आहे.

जीविता राजाशेखर-
अभिनेते राजाशेखर यांच्या पत्नी आणि भाजपच्या माजी प्रवक्त्या जीविता राजाशेखर यांनी ‘अंकुशम’, ‘आहुती’ आणि ‘धरम पत्नी’ या चित्रपटांमध्ये काम केलेय. २०१५ साली सेन्सॉर बोर्डावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली.

मिहिर भुटा-
प्रसिद्ध लेखकांमध्ये गुजराती लेखक मिहिर भुटा यांचे नाव घेतले जाते. गुजराती आणि हिंदी नाटकांसाठीही त्यांनी लेखन केलेय. पहलाज निहलानी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या सदस्यांमध्ये त्यांचाही समावेश होता.

गौतमी तदीमल्ला-
तमिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करणारी गौतमी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रजनीकांत, कमल हसन, मनमूट्टी, मोहनलाल या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत तिने काम केलेय.

नरेश चंदर लाल-
चित्रपट आणि रंगभूमीवरील योगदानाकरिता नरेश चंदर लाल यांना २०१६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले.

नरेंद्र कोहली-
पद्मश्री (२०१७) आणि व्यास सन्मानाने (२०१२) गौरविण्यात आलेले नरेंद्र कोहली हे भारतीय साहित्यातील योगदानाकरिता ओळखले जातात.

वामन केंद्रे-
निर्णय समितीत उच्चपदी निवड होणे हे वामन केंद्रेंसाठी नवीन नाही. नाट्यशास्त्राचा तगडा अनुभव असणाऱ्या आणि दोन दशकांपेक्षाही जास्त काळ रंगभूमीला दिलेल्या वामन केंद्रे यांचे नाव फक्त रंगभूमी आणि त्यासंबंधित घेण्यात येणाऱ्या कार्यशाळांपुरतेच मर्यादित नाही तर ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या व्हिजन प्लॅन कमिटीसाठी, गोवा सरकारच्या व्हिजन प्लॅन कमिटीसाठी, ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनसाठी सल्लागार समिती आणि सत्यजित रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या सोसायटी ऑफ गव्हर्निंग काउन्सिलसाठी आणि अशा अनेक संस्थांच्या निर्णय समितींमध्ये त्यांचे नाव आवर्जुन घेतले जाते.

विवेक अग्निहोत्री-
‘हेट स्टोरी’ या चित्रपटाकरिता विवेक अग्निहोत्री प्रसिद्ध आहे. ‘चॉकलेट : डीप डार्क सिक्रेट्स’, ‘धन धना धन गोल’, ‘झिद’, ‘बुद्धा इन द ट्रॅफिक जॅम’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनाकरिता ते ओळखले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 5:11 pm

Web Title: this is the censor board under prasoon joshi
Next Stories
1 दुसऱ्यांदा बाबा झाला फरदीन खान, बाळाचे नाव…
2 आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांचा समन्स
3 ‘मेलबर्न  आयएफएफएम २०१७’ मध्ये मुलीसह ऐश्वर्याने केले ध्वजारोहण
Just Now!
X