सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच आपला चाहतावर्ग तयार केला. सोशल मीडियावरील पोस्ट, प्रमोशनदरम्यान तिने दिलेल्या मुलाखती, कार्यक्रमांमध्ये आत्मविश्वासानं वावरणं पाहता बॉलिवूडमध्ये ती नव्याने आली आहे असं जाणवतच नाही. मुलाखतींमध्येही ती बेधडकपणे, मनमोकळेपणाने उत्तरं देते. असंच एक उत्तर तिने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ६’ या चॅट शोमध्ये दिलं होतं. तुला कोणत्या अभिनेत्याला डेट करायला आवडेल असा प्रश्न करणने साराला विचारला होता. त्यावर तिने अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव घेतलं होतं. साराच्या या इच्छेबाबत कार्तिक काय प्रतिक्रिया देतो याची उत्सुकता अनेकांना होती. काही कार्यक्रमांमध्ये त्याला हा प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता. कार्तिकने नुकतंच त्याचं उत्तर दिलं आहे आणि ते ऐकून सारा नक्कीच खूश होईल.

‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला कार्तिक आर्यन सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कार्तिकचाही मोठा चाहतावर्ग आहे. साराने थेट एका चॅट शोमध्ये त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला उत्तर देणं भाग होतं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘साराने तिचा पत्ता पाठवावा, मी वाट पाहतोय.’ सारा आणि मी पार्ट्यांमध्ये भेटलो आहोत आणि तेव्हा फक्त हॅलो-हाय इतकंच बोलणं झालं होतं, असंही तो म्हणाला. कार्तिकच्या या उत्तरानंतर आता सारा काय म्हणतेय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

वाचा : जाणून घ्या, ‘केदारनाथ’ची दोन दिवसांची कमाई 

साराचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट ‘केदारनाथ’ नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षक- समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.