सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचं स्वप्न कोणाचं नसेल ? पण, ज्येष्ठ अभिनेते व लेखक गिरीश कर्नाड यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव स्वतःहून फेटाळला होता. उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या गिरीश कर्नाड यांच्या आत्मचरित्रात हा प्रसंग सांगितलं आहे.

१९७४-७५ साली गिरीश कर्नाड पुण्यातील FTII संस्थेचे अध्यक्ष होते. त्याचवेळेस त्यांच्याकडे हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव आला होता. हेमा मालिनी यांची आई जया चक्रवर्ती या स्वतः या लग्नासाठी प्रयत्न करत होत्या. कर्नाडांनी आत्मचरित्रात म्हटले आहे की, जया चक्रवर्ती ‘स्वामी’ चित्रपटाची निर्मिती करत होत्या. त्या चित्रपटात मी प्रमुख भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती. मला त्यांच्याकडून अनेक आमंत्रणं येऊ लागली. हळू हळू त्यामागचा हेतू माझ्या लक्षात आला. त्या हेमा मालिनीसाठी मुलगा शोधत होत्या. तेव्हा ‘हेमा मालिनी व धर्मेद्र’ यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा होत्या. ते प्रकरण संपवून हेमा मालिनी यांच्या जीवनाची नवी सुरुवात करून देण्याची त्यांची इच्छा होती.

त्याकाळी हेमा मालिनी खूप यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यांच्याशी लग्न करण्याची भारतातील प्रत्येक तरुणाची इच्छा होती. हेमा मालिनी यांच्या घरून कर्नाडांना जेवणासाठी बोलावण्यात येऊ लागले. जया चक्रवर्ती यांनी ‘रत्नदीप’ चित्रपटामध्ये हेमा मालिनी व कर्नाड यांची प्रमुख भूमिकेसाठी निवड केली होती. शूटिंगदरम्यान हेमा मालिनी यांनी कर्नाडांना भेटायला बोलावले व विचारले, “आपल्या लग्नाच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून येत आहेत याबाबदल तुझं मत काय?”. कर्नाडांनी त्यावर उत्तर दिले की, “माझ्यासाठी बातम्या काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. माझ्याकडे एक खास कारण आहे ज्यामुळे मी नकार देतोय.”

कर्नाडांनी पुढे लिहिले आहे की, ‘हेमा मालिनीशी मी लग्न करणे अशक्य होते. सरस्वतीला मी लग्नासाठी विचारले नव्हते. पण, तिने नकार दिला असता तरीही मी हेमाशी लग्न केले नसते. कारण, एकदा मी हेमाला विचारले होते की, “तू तमिळ चित्रपटांमध्ये कधीच काम का करत नाहीस?”, त्यावर ती हसून म्हणाली होती की, “तिथली माणसं किती काळी असतात.” या प्रसंगानंतरच त्यांच्या दृष्टीने हेमा मालिनी हे प्रकरण संपलं होतं.