‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत साकारलेल्या अक्षराच्या भूमिकेमुळे अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. फार कमी वेळात हिना खानने प्रसिद्धीचे शिखर गाठले. त्यानंतर ‘बिग बॉस ११’ या रिअॅलिटी शोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या हिनाने आता तिचं ट्विटर अकाऊंटच डिलीट करणार असल्याचा इशारा दिला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेलं ट्रोलिंगचं प्रमाण हिनाला अस्वस्थ करत असून तिने स्वत:च चाहत्यांना तसा इशारा दिला आहे.

‘बिग बॉस’च्या ११व्या पर्वानंतर हिना सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रीय झाली. चाहत्यांसाठी फिटनेस आणि वर्कआऊटचे व्हिडिओसुद्धा ती पोस्ट करत होती. मात्र अनेकदा यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली. सोशल मीडियावर सकारात्मकता ठेवण्यात मदत करा, अन्यथा मी माझे ट्विटर अकाऊंट डिलीट करेन, असा थेट इशाराच तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान तिने चाहत्यांना ताकीदच दिली आहे.

https://www.instagram.com/p/BglJUYpBEX1/

वाचा : हे तर अश्लिलतेचं चित्रण; ‘एक दो तीन’च्या रिमेकवर ‘तेजाब’चे दिग्दर्शक भडकले

बिग बॉसच्या शोदरम्यान हिना आणि अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्यात बरेच वादविवाद झाले होते. त्यावेळी सोशल मीडियावर दोघींच्या चाहत्यांमध्येही जुंपली होती. सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या घटना काही नवीन नाहीत. कलाकारांच्या कपड्यांवरून, त्यांनी मांडलेल्या मतावरून किंवा इतर काही कारणावरून बऱ्याचदा त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातं. यांसारख्याच घटनांना हिना वैतागली असून अखेर तिने चाहत्यांना सोशल मीडियावरून काढता पाय घेण्याचा थेट इशाराच दिला आहे.