‘उत्तर शोधलं की जगणं बदलतं’ या टॅगलाइनसह ‘कोण होणार करोडपती’ या रिअॅलिटी शोचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सैराट’ या सुप्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहेत. याआधी सचिन खेडेकर आणि स्वप्निल जोशी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. पण यंदा नागराज मंजुळेंनाच का निवडलं असा प्रश्न अनेकांना पडला होता.

नागराज मंजुळेंना सूत्रसंचालक म्हणून निवडण्याचा पहिला विचार सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड म्हणून अजय भाळवणकर यांच्या मनात आलं होतं. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘नागराज ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी सामान्य माणसातला हिरो शोधला. हा शोसुद्धा तसाच आहे. नागराज त्यावेळी नागपूरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. आम्ही तिथे त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सूत्रसंचालनाची ऑफर दिली. मला वाटलं की ते खूप विचार करतील पण त्यांनी अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत होकार दिला.’

नागराज मंजुळे यांनी पहिल्या-वहिल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणत या कोण होणार करोडपतीच्या निमित्ताने बऱ्याचशा जपून ठेवाव्या अशा पहिल्या गोष्टी घडल्याचं म्हटलं आहे. ‘माझं पहिलं सूत्रसंचालन, ए.व्ही. प्रफुलचंद्रबरोबर गायलेलं कोण होणार करोडपतीचं टायटल ट्रॅक ही माझ्या आयुष्यातलं पहिलंच गाणं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तेव्हा माझ्या आयुष्यात घडणाऱ्या या पहिल्या गोष्टींसाठी मी खूप मेहनत घेतली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. येत्या २७ मे पासून रात्री ८.३० ते ९.३० वाजता सोनी मराठीवर ‘कोण होणार करोडपती’ प्रसारित होईल.