‘सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन’वरील ‘सुपर डान्सर 3’ हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय, दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. या आठवड्यात गायक कुमार सानू यांनी हजेरी लावली.

कुमार सानूच्या प्रसिद्ध गाण्यांवर सुपर डान्सरमधील स्पर्धकांनी परफॉर्मन्स सादर केले. त्यांच्या ‘चुरा के दिल मेरा’ या प्रसिद्ध गाण्यावर साक्षीम आणि वैभव यांनी अप्रतिम नृत्य सादर केलं. या गाण्यावरील परफॉर्मन्स पाहताना शिल्पा शेट्टीला या चित्रपटाशी संबंधीत एक किस्सा आठवला. हा किस्सा तिने प्रेक्षकांनाही सांगितला.

वाचा : ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजयने पाच राज्यांत नऊ ट्रक भरून वाटले आइस्क्रीम, कारण…

‘बाजीगर’ या चित्रपटातील ‘काली काली आँखे’ हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. हे गाणे चित्रपटाच्या टीमला प्रचंड आवडले होते. शिल्पाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने ‘काली काली आँखे’ या गाण्यावर आपल्याला नृत्य करायला मिळावे असे तिला वाटत होते. “आम्ही बाजीगरसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मला ‘काली काली आँखे’ या गाण्याचा एक भाग व्हायचे होते. परंतु माझ्याऐवजी काजोलवर हे गाणे चित्रीत करण्याचे ठरले. त्यावेळी मला खूप राग आला होता. कारण काजोलचे डोळे काळे नसताना देखील काली काली आँखे तिच्यावर कसे चित्रीत होऊ शकते असा मला प्रश्न पडला होता,” असे शिल्पाने सांगितले.