फटकळ, रुक्ष, पटकन कोणालाही काहीही बोलणारी, मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट खपवून न घेणारी अशा आगाऊ सासूच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या उषा नाडकर्णींचा वाढदिवस आहे. उषाताईंना प्रेमळ भूमिकांमध्ये फारच क्वचित पाहिलं गेलं आहे. पण जर सोज्वळ भूमिका केल्या तर प्रेक्षकांचा त्यावर विश्वास बसणार नाही, असं खुद्द उषाताई म्हणतात.

एका मुलाखतीत याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ”मला खरेतर भांडखोर व्यक्तिरेखा साकारण्याचा कंटाळा आला आहे. पण मी जर सोज्वळ भूमिका केल्या तर प्रेक्षकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतील खाष्ट सासूच्या त्यांच्या व्यक्तिरेखेने बराच भाव खाल्ला होता. पण हिंदी मालिका लांबत जातात आणि मग व्यक्तिरेखेतील मजा निघून जाते.”

आजच्या पिढीला जरी उषा नाडकर्णी या टीव्ही मालिका आणि हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री म्हणून ठाऊक असल्या, तरी त्यांचे खरे कर्तृत्व सिद्ध झाले आहे ते रंगभूमीवर. रमेश पवार यांच्या ‘गुरू’ या राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या नाटकाद्वारे त्यांचे मराठी रंगभूमीवर आगमन झाले. त्यातील उषाताईंची बेबलीची भूमिका गाजली. पारितोषिकप्राप्त ठरली. नंतर हेच नाटक आय.एन.टी. या संस्थेने व्यावसायिक रंगभूमीवर आणले.

अतिशय फटकळ स्वभावाच्या आणि रोखठोक बोलणाऱ्या म्हणून नाट्य-चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असणाऱ्या उषा नाडकर्णींची कारकीर्द अशी लख्ख आहे.