बॉलिवूडचे तारे तारका हे नेहमीच त्यांच्या प्रेम-प्रकरणामुळे चर्चेत असतात. आपला लाडका अभिनेता अभिनेत्री कोणाला डेट करतोय हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता नेहमीच असते. पण, अनेकदा वरुण धवनबाबत चाहत्यांची निराशा होताना दिसते. कारण वरुण नेहमीच आपल्या प्रेयसीबद्दल बोलणं टाळतो. तिच्या नावाचा उल्लेख करणं किंवा ती प्रसिद्धीझोतात येणार नाही याची पुरेपुर काळजी वरुण घेतो. वरुण आपल्या प्रेयसीबाबत इतका पझेसिव्ह का आहे याचं आश्चर्य अनेकांना राहून राहून वाटतं.

नुकतंच वरुणनं याचं उत्तर दिलं आहे. ३१ वर्षांचा वरुण नताशा दलालला डेट करत आहे. लवकरच तो तिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चादेखील आहे. वरुणला एक कार्यक्रमात त्याच्या गर्ल फ्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी नताशाबद्दल माध्यमांसमोर न बोलण्याचं कारण त्यानं सांगितलं. ‘नताशाला प्रसिद्धीझोतापासून लांब राहणं आवडतं. ती एक सामान्य मुलगी आहे आणि तिला सामान्य मुलीसारखंच आयुष्य जगायचं आहे. तिच्या इच्छेचा मी मान राखतो किंबहुना ते माझं कर्तव्य आहे.  म्हणूनच मी तिच्याबद्दल बोलणं टाळतो” असं वरुण म्हणाला.

इतकंच नाही तर माझं आणि नताशाच खासगी आयुष्य प्रसिद्ध व्हावं असं मला वाटत नाही हेही तो म्हणाला. वरुण आणि नताशा गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत पण, वरुणनं मात्र कधीही खुलेपणानं आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती.